पुणे : पुढारी वृत्तसेवा : टाइम्स हायर एज्युकेशनतर्फे युवा विद्यापीठ क्रमवारी (यंग युनिव्हर्सिटी रँकिंग) जाहीर करण्यात आली. त्यात देशातील 14 उच्च शिक्षण संस्थांचा पहिल्या दोनशे संस्थांमध्ये समावेश असून पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर पुणे) 162 व्या स्थानी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जगभरात गेल्या 50 वर्षांमध्ये स्थापन झालेल्या उच्च शिक्षण संस्थांची कामगिरी युवा विद्यापीठ क्रमवारीसाठी विचारात घेण्यात आली. जागतिक विद्यापीठ क्रमवारीचेच निकष या क्रमवारीसाठी वापरण्यात आले. त्यानुसार अध्यापन, संशोधनात्मक वातावरण, संशोधन गुणवत्ता, आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन, उद्योगातून उत्पन्न, एकस्व अधिकार (पेटंट) अशा निकषांवर शिक्षण संस्थांचे मूल्यांकन करण्यात आले. जागतिक स्तरावर सिंगापूरच्या नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीने पहिले स्थान प्राप्त केले. तर फ्रान्समधील पॅरिस येथील पीएसएल रिसर्च युनिव्हर्सिटीने द्वितीय, द हाँगकाँग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीने तृतीय स्थान मिळवले.
क्रमवारीतील पहिल्या दोनशे विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्थांंमध्ये देशातील 14 विद्यापीठे, संस्थांनी स्थान मिळवले. त्यात केरळमधील कोट्टायमचे महात्मा गांधी विद्यापीठाने 81 वे स्थान पटकावले आहे. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर पुणे) 162 व्या स्थानी आहे. युवा विद्यापीठ क्रमवारी 2024 मध्ये देशातील एकूण 55 उच्च शिक्षण संस्थांनी स्थान मिळवले आहे. गेल्यावर्षी 45 संस्था तर 2020 मध्ये 26 शिक्षण संस्थांचा समावेश होता. यंदाच्या क्रमवारीत भारतातील काही शिक्षण संस्थांचे स्थान उंचावले आहे, अशी माहिती टाइम्स हायर एज्युकेशनने दिली.
हेही वाचा