Loksabha Election : चारशे पारसाठी उ.प्रदेश, बिहार ‘एनडीए’करिता ठरणार निर्णायक | पुढारी

Loksabha Election : चारशे पारसाठी उ.प्रदेश, बिहार ‘एनडीए’करिता ठरणार निर्णायक

येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ने ‘अबकी बार चारसौ पार’ असा नारा दिला आहे. त्यासाठी भाजपला स्वबळावर 370, तर अन्य घटक पक्षांना 30हून अधिक जागा जिंकाव्या लागतील. हे स्वप्न वास्तवात उतरविण्यासाठी भाजपसह ‘एनडीए’ला सर्वाधिक लक्ष उत्तर प्रदेश आणि बिहारवर केंद्रित करावे लागणार आहे. कारण, या दोन राज्यांत लोकसभेच्या तब्बल 120 जागा आहेत. (Loksabha Election)

लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय हवा तापत चालली आहे. 1984 मध्ये काँग्रेसने लोकसभेला 404 जागा जिंकून इतिहास घडविला होता. तशीच कामगिरी यावेळी सतराव्या सार्वत्रिक निवडणुकीत करून दाखविण्याचा निर्धार भाजपने केला आहे. भाजपसाठी सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जादूई व्यक्तिमत्त्व. त्यांनी सारा देश पिंजून काढायला सुरुवात केली आहे. त्याचवेळी विरोधी ‘इंडिया आघाडी’तील सहकारी पक्षच केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये परस्परांविरुद्ध उभे ठाकले आहेत. केरळमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात डाव्या पक्षांनी उमेदवारी दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर ‘एनडीए’ने जागावाटप जवळपास पूर्ण करत आणले आहे. आता त्या ठिकाणी उमेदवारांची घोषणा करणे हा एकमेव उपचार उरला आहे. आजच्या घडीला प्रचारात ‘एनडीए’ने आघाडी घेतली आहे, ही बाब कोणीच नाकारू शकत नाही. (Loksabha Election)

1984 मध्ये तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होत काँग्रेसने 514 पैकी 404 जागांवर अविश्वसनीय विजय मिळवला होता. त्यावेळी काँग्रेसला उत्तर प्रदेशात 85 पैकी 83, बिहारमध्ये 54 पैकी 48, महाराष्ट्रात 48 पैकी 43, मध्य प्रदेशात सर्व म्हणजे 40, गुजरातमध्ये सर्व 26, राजस्थानातही सर्व 25 आणि हरियाणात सर्व 10 जागांवर काँग्रेसने बाजी मारली होती. दक्षिणेकडील राज्यांचा विचार करायचा तर तेव्हा काँग्रेसने तामिळनाडूत 39 पैकी 25, आंध्र प्रदेशात 42 पैकी 30, कर्नाटकात 28 पैकी 24, केरळमध्ये 20 पैकी 13, तर पश्चिम बंगालमध्ये 42 पैकी 16 जागा जिंकल्या होत्या.

आघाड्या, अस्थैर्याचे पर्व

1984 मधील लोकसभेच्या निवडणुकांनंतर देशात दीर्घकाळपर्यंत आघाड्यांची सरकारे झपाट्याने आली आणि अल्प काळात लुप्तही झाली. तो काळ राजकीय अस्थैर्याचा होता. अखेर अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात तिसर्‍या वेळी म्हणजे 1999 मध्ये स्थापन झालेल्या सरकारने आपला कार्यकाळ पूर्ण केला. पाठोपाठ डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील सरकारने लागोपाठ दोनदा आपला कार्यकाळ पूर्ण केला. मात्र, तेव्हासुद्धा काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळालेले नव्हते. तब्बल तीस वर्षांनंतर भाजपने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 मध्ये पूर्ण बहुमत मिळविले. त्यानंतर 2019 मध्ये भाजपने स्वबळावर 303 जागा जिंकण्याची किमया करून दाखविली. (Loksabha Election)

भाजपचा चढता आलेख

1984 मधील सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर मात्र भाजपच्या जागा वेगाने वाढत गेल्या.उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार और आंध्र प्रदेश या राज्यांचे विभाजन झाले. जम्मू-काश्मीरचा खास दर्जा म्हणजेच 370 कलम बरखास्त करण्यात आले. त्या प्रदेशाचा राज्यदर्जाही काढून घेण्यात आला आणि लडाखला केंद्रशासित प्रदेश बनविण्यात आले. गेल्या चाळीस वर्षांत देशाचा राजकीय कॅनव्हास पूर्णतः बदलून गेला आहे. या पार्श्वभूमीवर, येत्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि ‘एनडीए’ला चारशे जागांचा टप्पा गाठण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी लागेल. मुख्य म्हणजे मोदी सरकारने राबविलेल्या कल्याणकारी योजना मतदारांच्या गळी उतरवाव्या लागतील.

गेल्या लोकसभा निवडणुकीत ‘एनडीए’ने गुजरातमध्ये 26, राजस्थानात 25, हरियाणात 10, दिल्लीत सात, उत्तराखंडमध्ये 5, हिमाचल प्रदेशात 4, त्रिपुरा व अरुणाचल प्रदेशमध्ये प्रत्येकी 2, चंदीगढ तथा दमण आणि दीवमध्ये भाजपने शानदार विजय मिळवला होता. एवढेच नव्हे तर मध्य प्रदेशात 29 पैकी 28, कर्नाटकात 28 पैकी 25, पश्चिम बंगालमध्ये 42 पैकी 18, तर बिहारमध्ये 40 पैकी 39 जागांवर भाजपने अभूतपूर्व विजय मिळवला होता.

भाजपसाठी उत्तर प्रदेश महत्त्वपूर्ण

भाजपला चारशेचा जादूई आकडा गाठण्यासाठी यावेळी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशवर अपार मेहनत घ्यावी लागणार आहे. गेल्या वेळी उत्तर प्रदेशात ‘एनडीए’ने 80 पैकी 64 जागा जिंकल्या होत्या. भाजपच्या खात्यात त्यातील 62 जागा गेल्या होत्या. उत्तर प्रदेशचे विभाजन करून तयार करण्यात आलेल्या उत्तराखंडमध्ये भाजप सर्व पाचही जागा जिंकत आला आहे. 2014 च्या तुलनेत 2019 मध्ये भाजपच्या जागा कमी झाल्या होत्या. 2014 मध्ये भाजपने 73 जागा जिंकल्या होत्या. 1977 मध्ये जनता पक्षाने आणीबाणीविरोधी लाटेत उत्तर प्रदेशातील सर्व 85 जागा जिंकल्या होत्या. (Loksabha Election)

तशी कामगिरी यावेळी भाजपला करून दाखवावी लागेल. यावेळी राष्ट्रीय लोकदल, अपना दल (एस) आणि निषाद पक्ष, ओमप्रकाश राजभर यांचा सुहेलदेव भारतीय समाज पक्ष यासारख्या छोट्या पक्षांना भाजपने सोबत घेतले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात सर्वोत्तम कामगिरी करून दाखविण्याचा विश्वास भाजपला वाटतो. त्याचबरोबर भाजपला बिहारमध्येही चमकदार कामगिरी करून दाखवावी लागणार आहे. या दोन राज्यांत असामान्य यश मिळाले, तर चारशेहून अधिक जागा जिंकण्याचे भाजपचे स्वप्न वास्तवात उतरू शकते.

Back to top button