नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, डॉ. सुखबीर सिंग संधू ECI मध्ये रुजू | पुढारी

नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, डॉ. सुखबीर सिंग संधू ECI मध्ये रुजू

पुढारी ऑनलाईन डेस्क : नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि डॉ. सुखबीर सिंग संधू यांनी शुक्रवारी निवडणूक आयोगात रुजू होऊन कामकाजाची सुत्रे हाती घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील त्रिसदस्यीय समितीने ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांची निवडणूक आयुक्त म्हणून निवड केली आहे. अरुण गोयल यांनी निवडणूक आयुक्त म्हणून तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर राजीव कुमार हे एकच निवडणूक आयुक्त होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींसह त्रिसदस्यीय समितीने या नावांची निवड केली आहे. या दोन्ही नावांना  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. या संदर्भातील अधिसूचना कायदा मंत्रालयाद्वारे काढण्यात आली. मात्र नावे निवडण्याच्या या एकूण प्रक्रियेवरून काँग्रेसने आपली नाराजी व्यक्त केली आहे.

निवडणूक आयुक्तांची दोन रिक्त पदे भरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील त्रिसदस्यीय बैठकीत ज्ञानेश कुमार, सुखबीर सिंग संधू, उत्पल कुमार सिंह, प्रदीप कुमार त्रिपाठी, इंदिवर पांडे, सुधीरकुमार गंगाधर रहाटे या सहा नावांवर चर्चा झाली होती. त्यापैकी ज्ञानेश कुमार, सुखबीर सिंग संधू या दोन नावांवर समितीने शिक्कामोर्तब केले.
अरुण गोयल हे देशाचे निवडणूक आयुक्त होते. मात्र त्यांनी ९ मार्चला अचानक तडकाफडकी राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूरही केला. त्यापूर्वीच अनुप पांडे निवडणूक आयुक्त म्हणुन फेब्रुवारी महिन्यात निवृत्त झाले होते. त्यामुळे निवडणूक आयोगात केवळ मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे एकमेव आयुक्त होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या संपूर्ण तयारीची जबाबदारी ही त्यांच्या एकट्याच्या खांद्यावर येणार होती. या पार्श्वभूमीवर नव्या आयुक्तांची निवड महत्त्वाची मानली जाते.
दरम्यान, निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी नवीन कायद्यानुसार पुनर्गठन करण्यात आलेल्या त्रिसदस्य समितीच्या या पहिल्याच नियुक्त्या आहेत. सरन्यायाधीशांव्यतिरिक्त निवड समितीमध्ये आता पंतप्रधान आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री तसेच विरोधी पक्षनेते यांचा समावेश आहे.

कोण आहेत ज्ञानेश कुमार आणि सुखबीरसिंह संधू?

निवडणूक आयुक्त म्हणून निवड करण्यात आलेले ज्ञानेश कुमार हे केरळमधील तर सुखबीर सिंग संधू हे पंजाबमधील आहेत. ज्ञानेश कुमार हे १९८८ च्या बॅचचे केरळ कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी गृह मंत्रालयात काम केले आहे. कलम ३७० संदर्भात निर्णय घेताना ते गृहमंत्रालयात कार्यरत होते. त्यासोबतच सुखबीर सिंग संधू हे उत्तराखंड राज्याचे मुख्य सचिव आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष राहिले आहेत.

हे ही वाचा :

 

Back to top button