NCP vs NCP | तुमचे ‘घड्याळ’ चिन्ह काढून घ्यावे लागेल, अजित पवार गटाला इशारा | पुढारी

NCP vs NCP | तुमचे 'घड्याळ' चिन्ह काढून घ्यावे लागेल, अजित पवार गटाला इशारा

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : तुमचा एक वेगळा राजकीय पक्ष आहे; मग शरद पवार यांचा फोटो आणि नाव का वापरता, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला गुरुवारी सुनावणीदरम्यान केला. स्वतःची स्वतंत्र ओळख तयार करण्यासाठी फोटो आणि निवडणूक चिन्ह स्वतःच्या पक्षाचे वापरले पाहिजे, असे मत प्रदर्शनही न्यायालयाने केले. (NCP vs NCP)

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय दिला होता. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी शरद पवारांचा फोटो वापरणार नाही, याची लेखी हमी द्या, असे आदेशच न्यायालयाने अजित पवार गटाला दिले. या प्रकरणावरील पुढील सुनावणी मंगळवारी (दि. 19) होणार आहे. शरद पवारांसोबत राहायचे नाही, असा निर्णय तुम्ही घेतला आहे, तर मग त्यांचा फोटो का वापरता? तुम्ही स्वतःची ओळख निर्माण करा, स्वतःचे स्वतंत्र निवडणूक चिन्ह वापरण्याचा विचार करा आणि त्याआधारे निवडणूक लढा, अशा स्पष्ट सूचनाही सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला केल्या. ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात शरद पवार गटाची बाजू मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षांचा निर्णयदेखील अजित पवार गटाच्या बाजूने लागला. या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

घड्याळ चिन्ह काढून घेण्याचा इशारा!

आम्हाला तुमचे घड्याळ हे निवडणूक चिन्ह काढून घ्यावे लागेल, अशी वेळ येऊ देऊ नका, असा इशाराही न्यायालयाने अजित पवार गटाला दिला. शरद पवारांचे नाव, फोटो वापरणार नाही, असे प्रतिज्ञापत्र आम्ही दोन दिवसांत न्यायालयाला सादर करणार असल्याचे अजित पवार गटाचे वकील मुकुल रोहतगी आणि मनिंदर सिंग यांनी सांगितले. न्यायालयाने शनिवारपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. (NCP vs NCP)

Back to top button