NCP vs NCP Crisis : निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात | पुढारी

NCP vs NCP Crisis : निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत दिलेला निर्णय आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांचा निर्णय या दोन्ही निकालाविरोधात शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. तसेच या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणीही शरद पवार गटाने केली आहे. या याचिकेवर येत्या सोमवारी सुनावणी होऊ शकते. (NCP vs NCP Crisis)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजिप पवारांना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. त्यानंतर या निर्णयाविरोधात शरद पवार गटाकडून १२ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. मात्र त्यात कागदपत्रे पूर्ण नव्हती, त्यामुळे ती याचिका प्रलंबित होती. पुढे १५ फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांनी अजित पवारांच्या बाजुनेच निकाल दिला. १५ फेब्रुवारीला विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आल्यानंतर जुन्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेसह विधानसभा अध्यक्षांचा निर्णय या दोघांना आव्हान देणारी एकत्र याचिका सर्वोच्च न्यायालयात शरद पवार गटाकडून दाखल करण्यात आली. तसेच या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणीही शरद पवार गटाने केली आहे.

शरद पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेवर या प्रकरणी लवकरच सुनावणीची तारीख देऊ, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान या याचिकेवर पुढील आठवड्यात सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर अजित पवार गटाने व्हीप काढल्यास तो आम्हाला पाळावा लागेल, त्यामुळे या प्रकरणावर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती शरद पवार गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केली. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना दिले. मात्र शरद पवार गटाला अद्याप चिन्ह मिळालेले नाही. तर राज्यसभा निवडणुकीच्या कालावधीसाठीच ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ हे नाव शरद पवार गटाला देण्यात आले होते. या गोष्टींचा उल्लेखही याचिकेत करण्यात आला आहे. (NCP vs NCP Crisis)

अजित पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट निर्माण झाले. यानंतर दोन्ही गटांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचाच असा दावा केला. हा वाद पुढे निवडणूक आयोगात गेला. आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे घड्याळ चिन्ह हे अजित पवारांकडे देण्याचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शरद पवार गट न्यायालयात जाऊ शकते याचा अंदाज अजित पवार गटाला होता. त्यामुळे अजित पवार गटाने खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले होते. त्यामुळे न्यायलयात शरद पवार गटाच्या याचिकेवर सुनावणी होईल तेव्हा अजित पवार गटाचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. (NCP vs NCP Crisis)

हेही वाचा :

Back to top button