NCP Crisis : अजूनही ‘काका’च का? अमोल कोल्हेंची अजित पवारांवर कवितेतून टोलेबाजी | पुढारी

NCP Crisis : अजूनही 'काका'च का? अमोल कोल्हेंची अजित पवारांवर कवितेतून टोलेबाजी

पुढारी ऑनलाईन डेस्क : शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांची “दिल्लीला महाराष्ट्राला झुकवण्यासाठी काका हवा असतो, महाराष्ट्राला स्वाभिमानाने लढण्यासाठी काकाच हवा असतो…” असा आशय असणारी कविता सध्या राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यांनी या कवितेतून अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ही कविता त्यांनी गुरुवारी (दि.१५) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या कार्यक्रमात म्हटली. (NCP Crisis)

NCP Crisis : आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच स्थित्यंतर होवून गेली. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अजित पवार गटाने बाजुला होत भाजपशी युती केली. गुरुवारी (दि.१५) शिवसेनेप्रमाणेच विधिमंडळातील बहुमताच्या आधारावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरी राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवारांची असल्याचा निवाडा दिला. दरम्यान अजित पवार आणि शरद पवार गट यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. “आता पापापा सारखं काकाका असं करावं लागणार” असं अजित पवार यांनी वक्तव्य करत शरद पवार गटाला टोला लगावला होता. दरम्यान “काका”च का ?? याचं विनम्र उत्तर ! असं लिहित शरद पवार गटाचे खासदार, डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या ‘X’ अकाउंटवर एक कविता शेअर केली आहे. त्यांनी या कवितेतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या कवितेत म्हटलं आहे की, त्यांच्या या कवितेचा व्हिडीओ खा. सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी द्विट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरलं होत आहे.

“काका”च का ?? याचं विनम्र उत्तर !

“कुणीतरी म्हणालं काका का?
जनता म्हणाली अजूनही काकाच का?
पक्ष मिळाला, चिन्ह मिळालं, सगळं मनासारखं झालं,
तरी अजूनही काका, का काका?
बोलवताना धनी पुरेपूर जाणतो काका का,
पण महाराष्ट्राला पक्कं ठाऊक आहे, काकाच का?
कारण, काका फक्त माणूस नसतो, काका फक्त नेता नसतो,
५० वर्षे महाराष्ट्राच्या मातीतून, ५० वर्षे महाराष्ट्राच्या माणसांतून
वाहणारा काका एक विचार असतो.
सर्वसामान्य शेतकरी, युवक, महिला प्रत्येक वर्गाला,
मुजोर व्यवस्थेला का? हा प्रश्न विचारण्याची ताकद देतो.
काटेवाडीच्या का पासून ते कारगिलच्या का पर्यंत,
काळ्या मातीच्या का पासून ते कणखर कातळा पर्यंत,
महाराष्ट्राची, दिल्लीतली ओळख काका, काकाच असतो.
कांदा, कापसापासून कारखान्याच्या का पर्यंत,
प्रत्येकाचा आधार काका असतो.
शेताच्या बांधावर काका असतो,
विचारवंतांच्या बैठकीत काका असतो.
उद्योगधंद्यांच्या धोरणात काका असतो,
म्हणून महाराष्ट्राचा अभिमान काका असतो.
म्हणूनच दिल्लीला महाराष्ट्राला झुकवण्यासाठी काका हवा असतो…
महाराष्ट्राला स्वाभिमानाने लढण्यासाठी काकाच हवा असतो…
काका का हा प्रश्न जरी कुणाला पडतो
म्हणूनच, काका का आणि काकाच का हे
स्वाभिमानी महाराष्ट्र पुरेपूर जाणतो.”

हेही वाचा 

Back to top button