गेल्या दोन वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी झाल्या. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचे चित्रच पालटले. या बंडानंतर शिंदे-फडणवीस अशी युती होत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. वर्षभराच्या काळानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार आपल्या काही समर्थकांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. शिवसेनेचा वाद निवडणूक आयोगाकडे जात शिवसेनेचे चिन्ह आणि पक्ष शिंदे गटाकडे गेले. तर दुसरीकडे अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा केला. अखेर ६ महिन्यांहून अधिक काळ चालू असलेल्या १० हून अधिक सुनावणीनंतर निवडणूक आयोगाकडून मंगळवारी (दि. ६) निर्णय देण्यात आला आहे की, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह दोन्ही अजित पवार गटाकडे राहील.