Closing Bell | चौफेर खरेदीमुळे बाजार चमकला! सेन्सेक्स ४९६ अंकांनी वाढून बंद, निफ्टी २१,६०० पार | पुढारी

Closing Bell | चौफेर खरेदीमुळे बाजार चमकला! सेन्सेक्स ४९६ अंकांनी वाढून बंद, निफ्टी २१,६०० पार

पुढारी ऑनलाईन : जागतिक सकारात्मक संकेतांच्या जोरावर आज भारतीय शेअर बाजाराने तेजीत व्यवहार केला. आज बाजारात चौफेर खरेदी दिसून आली. सर्वाधिक खरेदी मेटल आणि फायनान्सियल क्षेत्रातील शेअर्समध्ये झाली. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स ६०० हून अधिक अंकांनी वाढून ७१,८९५ पर्यंत वाढला. त्यानंतर सेन्सेक्स ४९६ अंकांच्या वाढीसह ७१,६८३ वर बंद झाला. तर निफ्टी १६० अंकांनी वाढून २१,६२२ वर स्थिरावला. (Closing Bell)

सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या चिन्हात बंद झाले. ऑटो, कॅपिटल गुड्स, आयटी, FMCG, मेटल, ऑईल आणि गॅस आणि पॉवर प्रत्येकी १-२ टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी १ टक्क्यांनी वाढले.

संबंधित बातम्या 

सेन्सेक्स आज ७१,७८६ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ७१,८९५ अंकांपर्यंत वाढला. सेन्सेक्सवर भारती एअरटेल, एनटीपीसी, टेक महिंद्रा, टाटा स्टील, एम अँड एम, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. तर इंडसइंड बँकेचा शेअर्स टॉप लूजर ठरला. हा शेअर ३ टक्क्यांनी घसरून १,५६० रुपयांवर आला. त्याचसोबत एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये आजही घसरण कायम राहिली. हा शेअर्स आज १ टक्क्याच्या घसरणीसह १,४७० रुपयांपर्यंत खाली आला.

एनएसई निफ्टीवर ओएनजीसी, भारती एअरटेल, एनटीपीसी, टेक महिंद्रा, एसबीआय लाईफ हे शेअर्स वाढले. तर इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक हे शेअर्स घसरले.

अल्ट्राटेक सिमेंट शेअर्स वधारला, काय कारण?

अल्ट्राटेक सिमेंटने आर्थिक वर्ष २०२४ च्या तिसर्‍या तिमाहीत निव्वळ नफ्यात ६८ टक्क्यांची वाढ नोंदवली. या पार्श्वभूमीवर अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर्स २ टक्क्यांनी वाढून १०,०९१ रुपयांवर पोहोचला. सिमेंट कंपनी अल्ट्राटेकने डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत १,७७७ कोटींचा निव्वळ नफा कमावला, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीतील १,०५८ कोटींच्या तुलनेत ६८ टक्क्यांनी अधिक आहे.

परदेशी गुंतवणूकदार

एक्सचेंज आकडेवारीनुसार, परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) मागील सत्रात निव्वळ आधारावर ९,९०१.५६ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) ५,९७७.१२ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.

जागतिक बाजार

अमेरिकेच्या शेअर बाजारातील निर्देशांक काल वाढून बंद झाले होते. आज आशियाई बाजारातही तेजीचे वातावरण आहे. MSCI चा जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा विस्तृत निर्देशांक १ टक्क्यांनी वाढला. जपानचा निक्केई १.४० टक्क्यांनी, तर कोरियाचा कोस्पी १ टक्क्यांनी वाढला. दरम्यान, हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक ०.५ टक्क्यांनी घसरला. (Closing Bell)

Back to top button