PepsiCo India चे नवे सीईओ जागृत कोटेचा कोण आहेत? | पुढारी

PepsiCo India चे नवे सीईओ जागृत कोटेचा कोण आहेत?

पुढारी ऑनलाईन : पेय आणि स्नॅक्स निर्माता कंपनी पेप्सिको इंडिया (PepsiCo India) ने जागृत कोटेचा यांची नवे सीईओ (CEO) म्हणून नियुक्ती केली आहे. कोटेचा सध्या आफ्रिका, मध्य पूर्व आणि दक्षिण आशियामधील पेप्सिकोचे मुख्य व्यावसायिक अधिकारी असून ते पेप्सिको इंडियाचे सीईओ म्हणून अहमद अल शेख यांची जागा घेतील.

पेप्सिको इंडियाने त्यांच्या कार्यकारी टीममधील नव्या नेतृत्वाच्या महत्त्वपूर्ण बदलाची घोषणा केली आहे. जवळपास सात वर्षांच्या नेतृत्वानंतर सध्याचे पेप्सिको इंडियाचे CEO अहमद अल शेख मार्च २०२४ पर्यंत मध्य पूर्व व्यवसाय युनिटचे CEO म्हणून पेप्सिकोमध्ये नवीन जबाबदारी स्वीकारतील.

काल भारतातील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना या नेतृत्व बदलाची माहिती देण्यात आली. पेप्सिको इंडियाने २०२३ मध्ये त्यांच्या परिवर्तनाच्या प्रवासाला गती देत मजबूत आर्थिक उलाढालीची कामगिरी कायम ठेवली होती. कंपनीने म्हटले आहे की, “हे यश कंपनीचे भारतीय बाजारपेठेबद्दलचे सखोल आकलन, उत्पादन विकासासाठीचा तिचा नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि कार्यक्षम वितरण धोरणे अधोरेखित करते. पेप्सिको इंडियाचे यश हे भारतीय ग्राहकांच्या विविध आवडीनिवडी पूर्ण करण्याच्या त्यांच्या अनुकूलतेचा आणि त्यांच्या वनबद्धतेचा एक पुरावा आहे. गेल्या काही वर्षांतील प्रयत्नांमुळे भारतीय खाद्यपदार्थ आणि पेय उद्योगाच्या लीग टेबलमध्ये त्यांचे स्थान मजबूत झाले आहे.”

PepsiCo चे सध्याचे चीफ कमर्शिअल ऑफिसर आणि PepsiCo India चे नवे CEO जागृत कोटेचा यांनी म्हटले, “गेल्या ३० वर्षांपासून पेप्सिको परिवाराचा भाग असल्याने मी पेप्सिको इंडियाची उत्कृष्टता आणि नाविन्यपूर्णतेची अतूट बांधिलकी प्रत्यक्षपणे पाहिली आहे. नवीन जबाबदारी, भारतीय बाजारपेठेतील वृद्धी सुनिश्चित करून आमचे ध्येय पुढे नेण्यासाठी मी उत्सुक आहे.”

कोण आहेत जागृत कोटेचा?

कोटेचा यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, जागृत कोटेचा २०१६ ते २०१९ दरम्यान भारतातील स्नॅक्स श्रेणी विभागाचे उपाध्यक्षपद होते. पेप्सिकोच्या आधी, ते १९९२-१९९४ पर्यंत चॉकलेट मेकर कंपनी कॅडबरी इंडियामध्ये सेल्स हेड म्हणून होते. कोटेचा हे मुंबई विद्यापीठातून केमिकल इंजिनीअरिंगमधून पदवीधर आहेत. त्यांनी SVKM च्या नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (NMIMS) मधून मार्केटिंगमध्ये मास्टर ऑफ बिझनेस ॲमिनिस्ट्रेशन (MBA) देखील केले आहे.

हे ही वाचा :

 

Back to top button