हवी जोखीमरहीत गुंतवणूक

हवी जोखीमरहीत गुंतवणूक

चुकीच्या ठिकाणी गुंतवलेल्या पैशामुळे आपले नुकसान तर होतेच शिवाय वेळेचे नुकसान हे जास्त असते. हीच गुंतवणूक आपण योग्य ठिकाणी आपल्या गरजांचा नीट आढावा घेऊन केली, तर वेळेनुसार ती आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त आणि निश्चित परतावासुद्धा मिळवून देऊ शकते.

आजच्या काळात श्रीमंत असो की गरीब, प्रत्येक व्यक्तीचे बँक खाते असणे आवश्यक आहे. कारण, पगारापासून वेतन आणि इतर सरकारी योजनांचे पैसे थेट खात्यात येतात. बँकांमध्ये खाती उघडण्यासाठी बचत, चालू आणि वेतन खाती असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, देशातील बहुतांश लोकांकडे बचत खाते आहे. देशातील बहुतांश व्यवहार बचत खात्यांतूनच होतात. तुम्ही तुमच्या बचत खात्यात किती रक्कम ठेवू शकता याची मर्यादा नाही; पण बचत खात्यात जमा केलेले पैसे आयकराच्या कक्षेत येतात, हे लक्षात ठेवावे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसनुसार, एका आर्थिक वर्षात कोणत्याही बँक खात्यात 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम असेल, तर त्याची माहिती आयकर विभागाला देणे बँकेला बंधनकारक आहे.

ही मर्यादा FD, म्युच्युअल फंड, बाँड आणि शेअर्समधील गुंतवणुकीवरदेखील लागू होते. त्याच वेळी बचत खात्यावर मिळणार्‍या व्याजावरही कर भरावा लागतो; परंतु त्याच्याशी संबंधित काही नियम आहेत. आयकर कायदा कलम 80 TTA अंतर्गत, एका आर्थिक वर्षात बचत खात्यावर मिळणार्‍या 10,000 रुपयांपर्यंतच्या व्याजावर सामान्य लोकांवर कोणताही कर आकारला जात नाही; पण व्याजाची रक्कम यापेक्षा जास्त असल्यास कर भरावा लागेल. मात्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा 50 हजार रुपयांपर्यंत आहे. एवढेच नाही, तर बचत खात्यातून मिळणारे व्याज इतर स्रोतांकडून मिळणार्‍या उत्पन्नात जोडले जाते आणि मग तुम्हाला संबंधित कर निर्धारित नियमानुसार एकूण उत्पन्नावर कर भरावा लागेल.

ज्यांना कुठलीही जोखीम घ्यायची नसेल त्यांनी पोस्टातील खालील योजनांमध्ये गुंतवणूक करणे योग्य राहील; पण एक लक्षात ठेवावे की, म्युच्युअल फंडसारख्या कमीत कमी जोखमीतील गुंतवणुकीपेक्षा येथे व्याज मात्र कमी मिळते.

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (PORD) : वाढत्या महागाईमध्ये प्रत्येकाला भविष्यासाठी काहीतरी वाचवायचे आहे. अशा स्थितीत तुम्हालाही कुठेतरी गुंतवणूक करायची असेल, तर गुंतवणुकीसाठी ही योजना सर्वोत्तम आहे. ही योजना पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (पोस्ट ऑफिस आरडी) आहे. पोस्ट ऑफिस आरडीमध्ये सध्या 6.5 टक्के वार्षिक व्याज दिले जात आहे. यामध्ये व्याज तिमाही आधारावर चक्रवाढ केले जाते. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिटमध्ये किमान मासिक 100 रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. 10 रुपयांच्या पटीत तुम्हाला पाहिजे तितकी गुंतवणूक करू शकता. तुम्ही PORD मध्ये मासिक 10,000 रुपये गुंतवत असाल, तर 5 वर्षांनंतर तुम्हाला मॅच्युरिटीवर 7,09,902 रुपये मिळतील. यामध्ये तुमची एकूण गुंतवणूक 6 लाख रुपये असेल आणि तुम्हाला 1,09,902 रुपये हमी व्याज मिळेल. PORD खाते 5 वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर पुढील 5 वर्षांसाठी वाढवता येते. यासह एखाद्याला 10 वर्षांसाठी ठेवायचा निधी ठेवायचा असेल, तर हमी निधी 16,89,871 रुपये होतो. यामध्ये 4,89,871 रुपये व्याज म्हणून मिळतील.

पोस्ट ऑफिस आरडीची सर्वात खास गोष्ट म्हणजे तुम्ही त्यावर कर्जदेखील घेऊ शकता. नियमानुसार 12 वेळा डिपॉझिट केल्यानंतर तुम्हाला ठेवीच्या 50 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकते. कर्जाची परतफेड एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये करावी लागते. कर्जावरील व्याज दर आरडीवरील व्याजापेक्षा 2 टक्के अधिक असेल. त्यात नॉमिनेशनचीही सोय आहे.

राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न योजना :

राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न खाते ही बचत योजना मासिक व्याज देते. एखाद्या व्यक्तीला या योजनेत जास्तीत जास्त 9 लाखांची गुंतवणूक करता येते ज्यावर 7.4 टक्केव्याज देण्यात येते. संयुक्त खाते असल्यास तुम्ही 15 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेचा कालावधी 5 वर्षांचा आहे. तुम्हाला या योजनेतून लवकर बाहेर पडायचे असेल, तर तुम्हाला पहिल्या वर्षामध्ये पैसे काढता येत नाहीत. तुम्ही एक वर्षानंतर किंवा तीन वर्षांपूर्वी खाते बंद केल्यास तुमच्या गुंतवणुकीतील 2 टक्के कपात केली जाईल. तुम्ही तीन वर्षांनी बाहेर पडण्याचा विचार करत असाल, तर 1 टक्के कपात केली जाईल. शेवटी या योजनेत तुम्हाला मिळालेल्या व्याजाच्या तुलनेत गुंतवणुकीतून वजा केलेली रक्कम कमी असेल. तुम्ही या योजनेत 1 लाख रुपये गुंतवले, तर तुम्हाला 5 वर्षांत एकूण 37,000 रुपये व्याज मिळेल. या योजनेची जास्तीत जास्त गुंतवणूक 15 लाख रुपये असल्यास तुम्हाला व्याज म्हणून शेवटी 5,55,000 रुपये मिळतील. ही योजना करमुक्त नाही.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना

60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही बचत योजना आहे. निवृत्त सरकारी कर्मचार्‍यांना 55 वर्षांनंतर आणि निवृत्त लष्करी अधिकार्‍यांना 50 वर्षांनंतर या योजनेचा लाभ घेता येतो. पोस्टाच्या बचत योजनांमध्ये या योजनेवर सर्वाधिक व्याज दर आहे. या योजनेचा व्याज दर 8.2 टक्के आहे. या योजनेत कमीत कमी 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 30 लाख रुपये गुंतवता येतात. बचत खात्यात दर तीन महिन्यांनी एकदा व्याज जमा केले जाते. 5 वर्षांच्या कार्यकाळासह तुम्ही पहिल्या वर्षात योजनेतून बाहेर पडल्यास कोणतेही व्याज दिले जाणार नाही. मागील तिमाहीचे व्याज बचत खात्यात जमा केले गेले असेल, तर गुंतवणुकीच्या रकमेतून ते वजा केले जाईल. तुम्हाला एक वर्षानंतर किंवा 2 वर्षांपूर्वी पैसे काढायचे असतील, तर गुंतवणुकीच्या रकमेपैकी 1.5 टक्के कपात केली जाईल. त्यानंतर खाते बंद केल्यावर 1 टक्का वजावट आकारली जाईल. तुम्ही या योजनेत 1 लाख रुपये गुंतवल्यास तुमच्याकडे 5 वर्षांत 1,41,000 रुपये असतील. तुम्ही योजनेत 30 लाखांची गुंतवणूक केली, तर तुमच्या हातात 5 वर्षांनंतर 42,30,000 रुपये असतील.

तुमच्या गुंतवणुकीवरील व्याज एका आर्थिक वर्षात 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल, तर त्यावर कर आकारला जाईल. आयकर लागू होण्याच्या रकमेपेक्षा कमी पैसे कमावल्यास तुम्ही लवकर फॉर्म 15G/15क भरून हे शुल्क टाळू शकता.

किसान विकासपत्र योजना

कोणतीही प्रौढ व्यक्ती त्याच्या नावावर किसान विकासपत्र खाते उघडू शकते. संयुक्त खाते 2 किंवा 3 लोक एकत्र उघडू शकतात. मुलाच्या नावाने त्याच्या पालकाच्या वतीने किसान विकासपत्र खातेदेखील उघडले जाऊ शकते. 10 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले मूलही हे खाते स्वतःच्या नावाने उघडू शकते. किमान 1000 रुपये जमा करून किसान विकासपत्र खाते उघडता येते. कमाल ठेवीवर कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही 100 रुपयांच्या पटीत कोणतीही रक्कम जमा करू शकता आणि परिपक्वतेवर दुप्पट रक्कम मिळवू शकता. एका व्यक्तीच्या नावाने अनेक खातीही उघडता येतात. सध्या, किसान विकासपत्र खात्यावर वार्षिक 7.5 टक्के व्याज मिळत आहे. 9 वर्षे आणि 11 महिन्यांनंतर तुमची ठेव दुप्पट होते. तुम्ही 1,000 रुपये जमा केल्यास तुम्हाला 9 वर्षे आणि 11 महिन्यांनंतर 2,000 रुपये परत मिळतील. तुम्ही 1 लाख रुपये जमा केल्यास तुम्हाला 2 लाख रुपये परत मिळतील. त्याचप्रमाणे तुम्ही जेवढे पैसे जमा कराल ते पैसे तुम्हाला दुप्पट मिळतील. कोणत्याही विशेष कारणांनी 2.5 वर्षांनंतरही खाते बंद करून पैसे काढता येतात. खातेधारकाच्या मृत्यूनंतरही खाते मध्यंतरी बंद केले जाऊ शकते.

बँक आणि पोस्टातील योजनांचा आढावा घेतल्यानंतर एक सूचना करावीशी वाटते, ती म्हणजे, बरेचदा लोक कमी काळात जास्त व्याज मिळते, या आशेने जाहिरातींना भुलतात आणि आयुष्यभराची पुंजी गमावण्याचा प्रसंग त्यांच्यावर येतो. थोडक्यात काय तर, चुकीच्या ठिकाणी गुंतवलेल्या पैशामुळे आपले नुकसान, तर होतेच शिवाय वेळेचे नुकसान हे जास्त असते. हीच गुंतवणूक आपण योग्य ठिकाणी आपल्या गरजांचा नीट आढावा घेऊन केली, तर वेळेनुसार ती आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त आणि निश्चित परतावासुद्धा मिळवून देऊ शकते. ज्यांना गुंतवणुकीत कुठल्याही प्रकारची जोखीम पत्करायची नाही त्यांनी बँकेतील ठेवी, पोस्ट खात्यातील विविध अल्पबचत योजना, राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना, प्रॉव्हिडंट फंड, वैयक्तिक विमा योजना, सरकारने किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी बाजारात विक्रीसाठी आणलेले कर्ज रोखे इ. योजनांत गुंतवणूक करायला सुरुवात करावी. शेवटी अर्थसाक्षरता महत्त्वाची आहे.

महिला सन्मान बचत योजना : (महिला सन्मान पत्र)

महिलांना बचत करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी पोस्ट ऑफिसची ही एक विशेष योजना आहे. या योजनेचा कालावधी दोन वर्षांचा आहे आणि दर वर्षी 7.5 % व्याज देण्यात येते. पोस्ट ऑफिस आणि बँकांद्वारे उपलब्ध इतर योजनांच्या तुलनेत, ही योजना अल्प मुदतीच्या बचतीसाठी जास्त व्याज देते. तुम्ही किमान रुपये 1000 ते 2,00,000 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले तर दोन वर्षांच्या शेवटी तुमच्या हातात 1,16,022 रुपये असतील. तुम्ही जास्तीत जास्त 2 लाख रुपये गुंतवले, तर दोन वर्षांच्या शेवटी 2,32,000 रुपये हाती येतील. ही योजना करमुक्त नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news