Stock Market Closing Bell | दिवसाच्या उच्चांकावरून सेन्सेक्सने ६५० अंक गमावले, बाजारात नेमकं काय घडलं? | पुढारी

Stock Market Closing Bell | दिवसाच्या उच्चांकावरून सेन्सेक्सने ६५० अंक गमावले, बाजारात नेमकं काय घडलं?

पुढारी ऑनलाईन : जागतिक सकारात्मक संकेत असतानाही भारतीय शेअर बाजारात आज मंगळवारी (दि.९) चढ-उतार दिसून आला. सेन्सेक्स ३० अंकांनी वाढून ७१,३८६ वर बंद झाला. तर निफ्टी ३१ अंकांच्या किरकोळ वाढीसह २१,५४४ वर स्थिरावला. पण आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने दिवसाच्या उच्चांकावरून खाली येत ६५० अंक गमावले. (Stock Market Closing Bell) सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स ६०० हून अधिक अंकांनी वाढला होता. पण दुपारच्या व्यवहारात तो खाली आला.

बँक आणि एफएमसीजी वगळता इतर सर्व निर्देशांकांनी आज हिरव्या चिन्हात व्यवहार केला. ऑटो, हेल्थकेअर, कॅपिटल गुड्स, मेटल, पॉवर आणि रियल्टी प्रत्येकी ०.५-२.५ टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप निर्देशांक सपाट बंद झाला, तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.३ टक्क्यांनी वाढला.

संबंधित बातम्या 

निफ्टी आयटी तेजीत

सुरुवातीला तेजी आणि नंतर नफावसुलीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी सपाट झाले. शेअर बाजारात आज वरच्या स्तरावरून काही प्रमाणात विक्री दिसून आली. निफ्टी आयटी सुमारे ०.५ टक्क्यांपर्यंत वाढला. ११ जानेवारीपासून सुरू होणार्‍या तिसर्‍या तिमाहीच्या निकालांपूर्वी बाजारात हालचाल दिसून आली.

सेन्सेक्स आज ७१,७७० वर खुला झाला होता. त्यानंतर त्यानंतर त्याने ७२ हजारांवर झेप घेतली. पण दुपारच्या व्यवहारात तो ७१,४०० च्या खाली आला. सेन्सेक्सवर एलटी, भारती एअरटेल, टाटा मोटर्स, सन फार्मा, टाटा स्टील, एनटीपीसी हे शेअर्स सर्वाधिक वाढले. तर नेस्ले इंडिया, एशियन पेंट्स, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक हे शेअर्स घसरले.

sensex closing

एनएसई निफ्टीवर हिरो मोटोकॉर्प, अदानी पोर्ट्स, एसबीआय लाईफ, अपोलो हॉस्पिटल आणि बजाज ऑटो हे टॉप गेनर्स होते. तर ब्रिटानिया, नेस्ले इंडिया, एशियन पेंट्स हे घसरले.

बजाज ऑटो शेअर्सची घौडदौड

बजाज ऑटोचे शेअर्स मंगळवारी ६ टक्क्यांपर्यंत वाढले आणि बीएसईवर हा शेअर्स ७,४२० रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले. या कंपनीच्या बोर्डाने निविदेद्वारे ४ हजार कोटी शेअर्श बायबॅकला मान्यता दिल्यानंतर बजाज ऑटोचे शेअर्स वधारले. त्यानंतर हा शेअर्स ७,१०० रुपयांवर आला. (Bajaj Auto share)

टाटा मोटर्सचे शेअर्स नव्या शिखरावर

३० डिसेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीत जॅग्वार लँड रोव्हर (JLR) घाऊक विक्रीत २७ टक्के वाढ नोंदवल्यानंतर टाटा मोटर्सचे शेअर्स आजच्या ट्रेडिंग सत्रात ३ टक्क्यांनी वाढून ८०९ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या शिखरावर पोहोचले. (Shares of Tata Motors) त्यानंतर बीएसई सेन्सेक्सवर हा शेअर्स १.५० टक्के वाढीसह ८०१ रुपयांवर स्थिरावला. (Stock Market Closing Bell)

अदानी पोर्ट्सचे शेअर्सही वधारले

अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनचे शेअर्स सुरुवातीला सुमारे ४ टक्क्यांनी वाढून NSE वर १,२१३.२५ रुपयांच्या नवीन उच्चांकावर पोहोचले. (Adani Ports Share Price) त्यानंतर दुपारच्या व्यवहारात हे शेअर्स १,१९७ रुपयांवर आले.

Back to top button