‘ईएलएसएस’ मधून मुदतीनंतर पैसे काढावेत की ठेवावेत? | पुढारी

'ईएलएसएस’ मधून मुदतीनंतर पैसे काढावेत की ठेवावेत?

मानसी जोशी

करबचतीसाठी गुंतवणूक करण्याचा हंगाम आता सुरू होणार आहे. यादरम्यान गुंतवणूकदार चांगला परतावा देणारे आणि कर सवलत देणार्‍या पर्यायांचा शोध घेत असतात. वास्तविक प्राप्तिकर बचत करणारे अनेक पर्याय आहेत. मात्र यातही इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम ( ईएलएसएस ) हा चांगला परतावा देतात. एवढेच नाही तर चार ते पाच वर्षांपर्यंत पैसे दुप्पट होऊ शकतात. यामुळे या योजनेत दीर्घकालासाठी गुंतवणूक करण्यास प्राधान्य देता येऊ शकते. 

संबंधित बातम्या 

ईएलएसएसचा तीन वर्षांचा लॉक इन पीरियड असतो आणि यात गुंतवणूक केल्यास 36 महिन्यांपर्यंत पैसे काढता येत नाही. त्यामुळे लॉक इन पीरियड संपल्यानंतर गुंतवणूक सुरू ठेवावी की नाही, हा प्रश्न उपस्थित राहतो. लॉक इन पीरियड संपल्यानंतर गुंतवणूकदारांनी काय करावे, गुंतवणूक काढून घ्यावी की सुरू ठेवावी?

लॉक इन पीरियड पूर्ण झाल्यानंतर काय करावे?

ईएलएसएस ही एक इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम आहे. म्हणजेच या फंडचा मोठा वाटा इक्विटीत जातो. ईएलएसएसमध्ये किमान 80 टक्के एक्स्पोजर इक्विटीमध्ये असते. हे तांत्रिकद़ृष्ट्या शंभर टक्के असू शकते. इक्विटी इन्व्हेस्टमेंटमध्ये ग्रोथ आणि कम्पाऊंडिंगचा लाभ दीर्घकाळाच्या गुंतवणुकीनंतरच मिळू शकतो. त्यामुळे लॉक इन पूर्ण झाल्यानंतर रक्कम काढलीच पाहिजे, असे नाही. फंड चांगला परतावा देत असेल तर गुंतवणूक सुरू ठेवण्याचा पर्याय निवडू शकतात.

म्हणजेच चांगला परतावा मिळाल्यानंतर तीन वर्षांच्या लॉक इन पीरियडनंतरही स्कीममध्ये पुढील काही वर्षे राहणे फायदेशीर राहू शकते. अर्थात, पैशाची गरज भासल्यास लॉक इन संपल्यानंतर नियमानुसार पैसे काढू शकतो. मात्र, लॉक इन संपल्यानंतर तीन ते पाच वर्षांपर्यंत गुंतवणूक सुरू ठेवत असाल तर चांगला परतावा मिळण्याची शक्यता राहते. अर्थात, अशा योजनेत पैसे ठेवताना त्याचा मागील काळातील परतावा कसा आहे, याचे आकलन करायला हवे.

परतावा चांगला नसेल तर लॉक इन पीरियड संपल्यानंतर चांगली ग्रोथ असणार्‍या अन्य योजनेत पैसे जमा करू शकतो. आपला उद्देश करबचतच असेल तर संपूर्ण रक्कम काढून टॅक्स बेनिफिट मिळवण्यासाठी योजनेत गुंतवणूक करू शकता. ईएलएसएसच्या दीर्घ काळाचा परतावा पाहिल्यास आपली गुंतवणूक स्ट्रॅटजी किती उपयुक्त आहे, हे समजते. ( ईएलएसएस )

कराचे नियम

ईएलएसमध्ये लाँग टर्म कॅपिटल गेन्स आकारला जातो. मात्र एक लाखापर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त आहे. प्राप्तिकर कायद्याच्या 80 सीनुसार निश्चित उत्पन्न देणार्‍या पर्यायावर सवलत मिळते, पण त्यावरचे उत्पन्न हे करपात्र असते. तसेच ‘लॉक इन’ नंतर पैसे काढावेतच, असे नाही. फायदा होत असेल तर आपण होल्ड ठेवू शकतो. तसेच आपल्याकडे जेव्हा पैसा येईल, तेव्हा एसआयपी सुरू करू शकता.

एसआयपी आणि एसआयपी टॉप अपची सुविधा

ईएलएसएसमध्ये गुंतवणूक करताना एसआयपीचा पर्याय घेऊ शकता. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ऐनवेळी आर्थिक वर्ष संपताना कर वाचविण्यासाठी कोणत्याही टॅक्स सेव्हिंग फंडमध्ये किंवा उत्पादनात गुंतवणूक करण्यासाठी होणारी धावपळ वाचेल. संपूर्ण वर्षात एसआयपीच्या माध्यमातून ‘ईएलएसएस’मध्ये गुंतवणूक केल्याने एव्हरेजिंगचा फायदा मिळतो आणि काळानुसार रिस्क अ‍ॅडजेस्टेड परतावा मिळतो. ईएलएसएसमध्ये गुंतवणूक करताना गरजेनुसार गुंतवणूक वाढविण्याचा देखील पर्याय असतो. यात नियमित रकमेसह आणखी एसआयपी सुरू करण्याची सुविधा असते किंवा त्याच रकमेत भर घालू शकतो. यानुसार करबचतीत वाढ करता येते. या स्ट्रॅटजीप्रमाणे वाढत्या उत्पन्नानुसार करबचत योजनेत देखील योगदान वाढवू शकतो.

तीन वर्षांनंतर काय असतो पर्याय?

आपण एकरकमी पैसे जमा केले असतील तर तीन वर्षांनंतर लॉक इन पीरियड संपल्यानंतर व्याजासह संपूर्ण रक्कम काढण्याचा पर्याय असतो. मात्र, एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास अशी कृती करता येत नाही. एसआयपी करणार्‍या गुंतवणूकदारांना केवळ तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झालेली गुंतवणूकच काढता येते. कारण तीन वर्षांचा लॉक इन पीरियड हा एसआयपीच्या प्रत्येक हप्त्याचा वेगवेगळा राहू शकतो.

उदा. आपण ईएलएसएसनुसार एसआयपीची पहिली रक्कम ही 1 जानेवारी 2021 मध्ये जमा केली असेल तर तीन वर्षांनंतर 1 जानेवारी 2024 मध्ये ती पूर्ण होईल; परंतु आपण 1 जानेवारी 2024 रोजी जी रक्कम जमा करू, त्यास तीन वर्षांनंतर 1 जानेवारी 2027 मध्ये काढू शकतो. म्हणजेच 1 जानेवारी 2021 ते 1 जानेवारी 2024 या काळात एसआयपीच्या माध्यमातून जेवढी रक्कम जमा करतो, तेवढी पूर्णपणे 2 जानेवारी 2027 नंतरच काढू शकतो.

Back to top button