Congress Manifesto Committee : काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा समितीची घोषणा | पुढारी

Congress Manifesto Committee : काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा समितीची घोषणा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी १६ सदस्यीय जाहीरनामा समितीची घोषणा करण्यात आली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम या समितीचे अध्यक्ष आहेत. तर प्रियंका गांधींचाही या समितीमध्ये समावेश आहे. महाराष्ट्रातील एकाही नेत्याचा या समितीत समावेश नाही. इंडिया आघाडीचा किमान समान कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी काँग्रेसने जाहिरनामा समितीची घोषणा करत यात आघाडी घेतली आहे.  Congress Manifesto Committee

गुरुवारी (दि. २१) काँग्रेस कार्यसमितीची बैठक काँग्रेस मुख्यालयात पार पडली. याच बैठकीत काँग्रेसच्या जाहीरनामा समितीबद्दल भाष्य करण्यात आले होते. आणि त्यानंतर तातडीने ही समिती गठीत करण्यात येईल, असेही या बैठकीनंतर सांगण्यात आले होते. त्यानुसार काँग्रेसने या समितीची घोषणा केली आहे.  सामान्यता जाहिरनामा समितीची घोषणा निवडणुकीपुर्वी किंवा निवडणुकाच्या नजिकच्या काळात केली जाते. मात्र काँग्रेसने लवकर घोषणा करत यात आघाडी घेतली आहे. Congress Manifesto Committee

काँग्रेस लोकसभा निवडणूक इंडिया आघाडीसोबत लढणार आहे. इंडीया आघाडीचाही स्वतंत्र जाहीरनामा असण्याची शक्यता आहे. त्यात आपले मुद्दे मागे पडु नयेत तसेच आपली वेगळी छाप पडावी, हा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे. तसेच काही दिवसांपुर्वी पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला गॅरंटी योजनांचा फायदा केवळ तेलंगणामध्ये झाला. अन्य राज्यात मात्र याचा फायदा झाला नाही. तेव्हा या योजनांबद्दल लोकसभेत काय करावे, हा प्रश्न काँग्रेससमोर असणार आहे. तसेच पक्षाचा जाहिरनामा सर्वांना पचेल आणि देशाच्या सर्व भागात स्वीकारार्ह असेल, यासाठी काँग्रेसला कष्ट घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करुन काँग्रेसन जाहिरनामा समितीची घोषणा लवकर केली आहे.

Congress Manifesto Committee जाहीरनामा समितीमधील सदस्य कोण ?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम या समितीचे अध्यक्ष आहेत तर छत्तीसगडचे माजी उपमुख्यमंत्री टी. एस. सिंहदेव हे या समितीचे संयोजक आहेत. या समितीमध्ये काँग्रेसच्या  सरचिटणीस प्रियंका गांधी, सरचिटणीस जयराम रमेश, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेस नेते खासदार शशी थरूर, माजी मंत्री आनंद शर्मा, खासदार गौरव गोगोई, प्रोफेशनल काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण चक्रवर्ती, खासदार इम्रान प्रतापगडी, आमदार के. राजू, खासदार रंजीत रंजन, मणिपूरचे माजी उपमुख्यमंत्री गईखंगम गंगमेई, आमदार जिग्नेश मेवाणी, आमदार ओंकार सिंग मरकाम, गुरदीप सप्पल यांचा समावेश आहे.

हेही वाचा 

Back to top button