Shahnawaz Hussain : मोठी बातमी! भाजप नेते शाहनवाज हुसेन यांना हृदयविकाराचा झटका | पुढारी

Shahnawaz Hussain : मोठी बातमी! भाजप नेते शाहनवाज हुसेन यांना हृदयविकाराचा झटका

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसेन (shahnawaz hussain) यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांना तत्काळ मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी दुपारी 4.30 वाजता त्यांना रुग्णालयात आणण्यात आल्याचे वृत्त आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहनवाज हुसेन (Shahnawaz Hussain) यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना प्रसिद्ध डॉक्टर जलील पारकर यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. त्यानंतर शाहनवाज यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहे. त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

रुग्णालयाचे डॉक्टर जलील पारकर यांनी सांगितले की, ‘शाहनवाज हुसैन (Shahnawaz Hussain) यांना हृदयविकाराच्या झटका आला आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. हुसैन सध्या आयसीयूमध्ये दाखल आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थीर आहे.’

याआधीही गेल्या महिन्यात त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यांना एम्स, नवी दिल्ली येथे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर एम्सच्या डॉक्टरांनी त्यांना व्हायरल न्यूमोनिया झाल्याचे निदान केले आणि उपचारानंतर विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता.

कोण आहेत शाहनवाज हुसेन?

शाहनवाज हुसेन यांची गणना भाजपच्या ताकदवान नेत्यांमध्ये केली जाते. ते दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमधील सर्वात तरुण मंत्री ठरले होते. हुसेन यांचा जन्म 12 डिसेंबर 1968 रोजी बिहारमधील सुपौल येथे झाला. ते सध्या बिहार विधान परिषदेचे सदस्य असून पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते देखील आहेत. यापूर्वीच्या नितीशकुमार आणि एनडीए सरकारमध्ये ते उद्योगमंत्री होते. या कार्यकाळात त्यांनी अनेक बदल केले.

Back to top button