Closing ‍‍Bell | बाजारात तेजीचा ‘षटकार’! सेन्सेक्स ६६,५९८ वर बंद, गुंतवणूकदारांना ११.३० लाख कोटींचा फायदा | पुढारी

Closing ‍‍Bell | बाजारात तेजीचा 'षटकार'! सेन्सेक्स ६६,५९८ वर बंद, गुंतवणूकदारांना ११.३० लाख कोटींचा फायदा

पुढारी ऑनलाईन : कमकुवत जागतिक संकेत असतानाही भारतीय शेअर बाजाराने तेजीची घौडदौड कायम ठेवली आहे. आज शुक्रवारी सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) सलग सहाव्या सत्रांत वाढून बंद झाले. सेन्सेक्स आज ३३३ अंकांनी वाढून ६६,५९८ वर बंद झाला. तर निफ्टी ९२ अंकांच्या वाढीसह १९,८१९ वर स्थिरावला. क्षेत्रीय पातळीवर कॅपिटल गुड्स, ऑईल आणि गॅस, पॉवर आणि रियल्टी प्रत्येकी १.५ ते २ टक्क्यांनी वाढले. तर फार्मा निर्देशांक ०.३ टक्क्यांनी घसरला. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.८ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.४ टक्क्यांनी वधारला. (Stock Market Closing ‍‍Bell)

सलग ६ सत्रांतील तेजीमुळे गुंतवणूकदारांना ११.३० लाख कोटींचा फायदा झाला आहे. पाच दिवसांत गुंतवणूकदार ९.५० लाख कोटींनी श्रीमंत झाले होते. आजच्या तेजीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात आणखी वाढ झाली. ३१ ऑगस्ट रोजी सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३०९.५९ लाख कोटी रुपये होते. आज ८ सप्टेंबर रोजी ते ३२१ लाख कोटींच्या जवळ पोहोचले.

सेन्सेक्स आज ६६,३८१ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६६,७६६ पर्यंत वाढला. सेन्सेक्सवर एनटीपीसी, टाटा मोटर्स हे शेअर्स अनुक्रमे २.५० टक्के आणि २ टक्क्यांनी वाढले. एलटीस, बजाज फिनसर्व्ह, भारती एअरटेल हे शेअर्सही १ टक्क्यांहून अधिक वाढले. टायटन, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, रिलायन्स, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक या शेअर्सनी आज हिरव्या चिन्हात व्यवहार केला. तर आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा, विप्रो, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील हे शेअर्स घसरले.

Stock Market Closing ‍‍Bell

बाजारातील दोन्ही निर्देशांक सलग दुसर्‍या आठवड्यातही तेजीत राहिले आहेत आणि ३० जून रोजी संपलेल्या आठवड्यानंतरचा हा सर्वोत्तम आठवडा राहिला आहे. आजच्या ट्रेडिंग सत्रातील तेजीत ऑटो, फायनान्सियल, रियल्टी आणि कंझ्यूमर ड्युरेबल क्षेत्रातील शेअर्स आघाडीवर राहिले. आजही मिडकॅप आणि स्मॉलकॅप स्टॉक्समध्ये तेजी कायम राहिली. या आठवडाभरात हे दोन्ही निर्देशांक ३.५ टक्क्यांहून अधिक वाढले आहेत.

निफ्टीवर कोल इंडिया, एनटीपीसी, बीपीसीएल, अदानी पोर्ट्स, टाटा मोटर्स हे शेअर्स वधारले. तर अल्ट्राटेक, आयशर मोटर्स हे घसरले.

बँक निफ्टीत वाढ

आजच्या ट्रेडिंग सत्रात बँक निफ्टी (Nifty Bank) १ टक्के वाढून ४५,३६७ वर पोहोचला. त्यानंतर तो ४५,२०० वर स्थिरावला. बंधन बँक, फेडरल बँक आणि एयू स्मॉल फायनान्स बँक यांचे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत वाढले. (Stock Market Closing ‍‍Bell)

अमेरिकेसह आशियाई बाजारात घसरण

अमेरिकेतील तंत्रज्ञान स्टॉक्समधील घसरणीनंतर शुक्रवारी आशियातील शेअर बाजारांमध्येही घसरण झाली. जपानचा निक्केई निर्देशांक (Japan’s Nikkei) आज १ टक्क्यांहून अधिक घसरला. चीनने सरकारी अधिकाऱ्यांना आयफोन वापरण्यास घातलेली बंदी आणि अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह व्याजदरवाढीबाबत कडक धोरण राबवणार असल्याच्या शक्यतेने अमेरिकेसह आशियाई बाजारातील गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. परिणामी अमेरिकेसह आशियाई बाजारात कमकुवत स्थिती दिसून आली. मुख्यतः टेक आणि इंडस्ट्रियल कंपन्यांचे शेअर्स अधिक घसरले आहेत. चिप उपकरणे बनवणारी कंपनी टोकियो इलेक्ट्रॉनचे शेअर्स ३ टक्क्यांहून अधिक घसरले. यामुळे निक्केई निर्देशांकाने ८५ अंक गमावले.

हे ही वाचा :

Back to top button