अर्थवार्ता

अर्थवार्ता

गत सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकामध्ये एकूण अनुक्रमे 169.50 अंक व 500.65 अंकांची वाढ होऊन दोन्ही निर्देशांक 19435.3 अंक व 65387.16 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये 0.88 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली, तर सेन्सेक्समध्ये 0.77 टक्क्यांची वाढ झाली. सातत्याने पाच आठवडे घट दर्शवल्यानंतर प्रथमच निफ्टी व सेन्सेक्सने गत सप्ताहात वाढ दर्शवली. सर्वाधिक वाढ दर्शवणार्‍या समभागांमध्ये जिओ फायनान्सियल सर्व्हिसेस (14.3 टक्के), मारुती सुझुकी इंडिया (8.7 टक्के), टाटा स्टील (8.7 टक्के), एनटीपीसी (5.9 टक्के), हिंडाल्को (5.2 टक्के) या कंपन्यांचा समावेश होतो. तर सर्वाधिक घट दर्शवणार्‍या समभागांमध्ये डॉ. रेड्डीज (-3.5 टक्के), हिंदुस्थान युनिलिव्हर (-2.3 टक्के), रिलायन्स इंडस्ट्रीज (-2.3 टक्के), अदानी एंटरप्राईझेस (-1.8 टक्के) यांचा समावेश होतो.

आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था मुडीजने आर्थिक वर्ष 2023 चे भारतीय अर्थव्यवस्था वृद्धीदराचे उद्दिष्ट 5.5 टक्क्यांवरून थेट 6.7 टक्के वाढवले.

ऑस्ट्रेलियाचा गुंतवणूकदार उद्योगसमूह जीक्यूजी पार्टनर्सने आयडीएफसी फर्स्ट बँकमध्ये 2.59 टक्के हिस्सा 2480.34 कोटींना खरेदी केला. 89 रु. प्रतिसमभाग दरावर जीक्यूजी पार्टनर्सच्या दोन वेगवेगळ्या फंडसनी एकूण 171.61 दशलक्ष समभाग खरेदी केले. वॉरबग निकस कंपनीची उपकंपनी क्लोवरडेल इन्व्हेस्टमेंटने आयडीएफसी फर्स्ट बँकचे एकूण 278.7 दशलक्ष समभाग (4.20 टक्के हिस्सा), बीएसई भांडवल बाजारात विकून टाकला.

भारतीय उत्पादन क्षेत्राची प्रगती दर्शवणारा एस अँड पी ग्लोबल इंडिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स निर्देशांक ऑगस्ट महिन्यात मागील तीन वर्षांच्या उच्चांकी म्हणजेच 58.6 टक्के पातळीवर पोहोचला.

एप्रिल ते जून या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम. पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर जगात सर्वाधिक म्हणजे 7.8 टक्क्यांवर पोहोचला. त्या आधीच्या मार्च तिमाहीतच (scquential quurter) हा अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर 6.1 टक्के होता. या चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था वृद्धीदर 6.5 टक्क्यांवर असण्याचा अंदाज केंद्र सरकारने कायम ठेवला आहे. याच तिमाहीत चीनचा अर्थव्यवस्था वृद्धीदर 6.3 टक्क्यांवर पोहोचला.

ओसीसीआरपी (ऑर्गनाइझ क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट) या जागतिक पातळीवर शोधपत्रकारिता करणार्‍या संस्थेचे अदानी समूहावर गंभीर आरोप. मॉरिशससारख्या करमुक्त असणार्‍या देशांतील कंपन्यांच्या माध्यमातून भारतात गुंतवणूक आणून, समूहाच्या कंपन्यांच्या समभाग मूल्यात कृत्रिमरित्या वाढ करण्यात आल्याचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यामुळे अदानी समूहातील कंपन्यांचे भांडवल बाजारमूल्य (Market Cap) गुरुवारच्या सत्रात काही तासांतच 35 हजार कोटींनी गडगडले. परंतु शुक्रवार सत्राअखेर पुन्हा 12.675 कोटींनी वधारले. अदानी समूहाचे ओसीसीारपी अहवालात केलेल्या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. सध्या अदानी समूहातील कंपन्यांचे एकूण भांडवल बाजारमूल्य 10 लाख 62 हजार कोटींच्या जवळपास स्थिरावले आहे.

ऑगस्ट 2023 मध्ये सरकारला जीएसटीच्या माध्यमातून 1 लाख 59 हजार कोटींचा महसूल मिळाला. मागील वर्षीच्या तुलनेत जीएसटी संकलनात तब्बल 11 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. मागील वर्षी ऑगस्टमध्ये जीएसटी करसंकलन 1 लाख 43 हजार कोटी होते.

उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेअंतर्गत (Product Linkal Incentive Scheme)  लॅपटॉप आणि पीसी बनवणार्‍या जगातील 32 कंपन्यांनी भारत सरकारकडे अर्ज केला. सर्वप्रथम मोबाईल बनवणार्‍या कंपन्यांसाठी सरकारने ही योजना आणली. आता यामध्ये काही बदल करून नवीन स्वरूपात सुमारे 17 हजार कोटींची ही योजना लॅपटॉप व कॉम्प्युटरवर बनवणार्‍या कंपन्यांसाठी जाहीर करण्यात आली. अर्ज करणार्‍या कंपन्यांमध्ये डेस, एचपी, लिनोव्हो, एसर, असूस, थॉमसन यासारख्या जागतिक पातळीवर कार्यरत असणार्‍या कंपन्यांचा समावेश आहे. एकूण 2430 कोटींची गुंतवणूक त्वरित स्वरूपात होण्याची शक्यता असून, 75 हजार जणांसाठी रोजगारनिर्मिती होण्याचा अंदाज आहे. हे क्षेत्र विस्तारून सुमारे 3 लाख 35 हजार कोटींची आयटी, हार्डवेअर निगडित वस्तूनिर्मिती करण्याची देशात क्षमता असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले.

2031 पर्यंत वाहननिर्मिती क्षमता दुप्पट करण्यासाठी 45 हजार कोटींची गुंतवणूक करून प्रकल्प उभारण्याची मारुती सुझुकी कंपनीची घोषणा. सध्या कंपनी वार्षिक 20 लाख वाहनांचे उत्पादन करत असून, ही क्षमता पुढील आठ वर्षांत 40 लाख करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी हरियाणामध्ये आणखी 18 हजार कोटींची गुंतवणूक करून वार्षिक 10 लाख गाड्या निर्माण करण्यासाठी नवीन प्रकल्प उभारण्यात येत आहेत, तसेच आणखी एक 10 लाख गाड्या निर्माण करण्यासाठी प्रकल्प उभारण्यासाठी जागेचा शोध सुरू असल्याचे चेअरमन आरसी भार्गव यांनी सांगितले.

19 सप्टेंबर रोजी रिलायन्स जिओ एअर फायबर इंटरनेट सुविधा सुरू करणार. सध्या वायरद्वारे फायबर इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. यापुढे वायरलेस स्वरूपात ही सुविधा उपलब्ध होईल. दर दिवशी देशातील दीड लाख ठिकाणांवर जिओ एअर फायबर सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. लवकरच 2 कोटी घरांपर्यंत तसेच 10 कोटी ग्राहकांपर्यंत जिओ एअर फायबर सुविधा नेण्याचे कंपनीचे उद्दिष्ट असलयचे मुकेश अंबानींनी सांगितले. तसेच समूहाची दुसरी उपकंपनी जिओ फायनान्सिअल सर्व्हिसेस लाईफ, हेल्थ आणि जनरल इन्श्युरन्स क्षेत्रात उतरणार असल्याचे घोषित केले. रिलायन्सच्या 46 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी संचालक मंडळावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला, तर रिलायन्स इंडस्ट्रीज या प्रमुख कंपनीतील संचालक मंडळावर पुढील पिढीतील आकाश, ईशा व अनंत अंबानी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

भारतीय स्पर्धा आयोग (Compitition Commission of India) ने टाटा समूहाच्या दोन विमान प्रवासी वाहतूक कंपन्या एअर इंडिया आणि एअर विस्तारा यांच्या एकत्रीकरणास (Nerger) मंजुरी दिली. एकत्रीकरणमधून तयार झालेल्या कंपनीकडे बाजारपेठेचा 19.3 टक्के हिस्सा असेल. दोन्ही कंपन्यांकडे मिळून एकूण 225 विमाने आहेत. या नवीन एकत्रीकरणानंतर तयार झालेल्या कंपनीत टाटा समन्सचा 74.9 टक्के, तर सिंगापूर एअरलाईन्सचा 25.1 टक्के हिस्सा असेल.

अपिलिय न्यायाधिकरण (सॅट)ने झी एंटरटेन्मेंट एंटरप्राईझेसचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत गोएंका तसेच एस्सेल समूहाचे अध्यक्ष सुभाष चंद्रा यांना सेबीप्रकरणी कारवाईतून दिलासा देण्यास नकार दिला. सूचिबद्ध कंपनीचा निधी अन्य कंपन्यांकडे वळवल्याप्रकरणी सेबीने या दोघांना कोणत्याही सूचिबद्ध कंपनीमध्ये संचालक वा प्रमुख व्यवस्थापकीय पदावर राहण्यास मनाई केली. याविरोधात या दोघांनी सॅटकडे धाव घेतली. परंतु सॅट या न्यायाधिकरणाने सेबीचा आदेश कायम ठेवला.

25 ऑगस्ट रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी 30 दशलक्ष डॉलर्सनी घटून 594.858 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news