विकसित देश व्हायचे, तर पुढील 5 वर्षे मोलाची : नरेंद्र मोदी | पुढारी

विकसित देश व्हायचे, तर पुढील 5 वर्षे मोलाची : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : 2047 मध्ये आम्ही स्वातंत्र्याच्या शतकपूर्तीचा उत्सव साजरा करू, त्यावेळी विकसनशील नव्हे; तर एक विकसित देश म्हणून अभिमानाने तिरंगा फडकवायचा असेल तर येणारी 5 वर्षे त्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. उद्यमशीलतेतील सातत्याच्या बळावर आपण जगातील आघाडीच्या पहिल्या 5 अर्थव्यवस्थांमध्ये समाविष्ट झालेलो आहोत. देशवासीयांना हा बदल कळतो आहे आणि त्यातून कमावलेल्या विश्वासाच्या बळावरच 2024 मधील स्वातंत्र्यदिनीही मीच पंतप्रधान म्हणून तिरंगा फडकावेन, असे ठाम प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी केले. येत्या 5 वर्षांत आपण जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनलेलो असू, असा शब्दही पंतप्रधानांनी देशाला दिला.

शहरी भागांतून भाड्याच्या घरात राहणार्‍यांना गृहकर्जात बँकेकडून सवलती दिल्या जातील. देशभरात 25 हजार जनऔषधी केंद्रे सुरू केली जातील, अशी शाश्वती देऊन पंतप्रधानांनी सरकारच्या गेल्या 10 वर्षांतील कामकाजाचा थोडक्यात आढावा घेतला.

देशाच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावल्यानंतर, माझ्या कुटुंबातील माझे 140 कोटी प्रिय सदस्य, अशी भाषणाची सुरुवात त्यांनी केली. (याआधी ते माझ्या प्रिय देशवासीयांनो, अशी सुरुवात करत असत.) त्यांनी मणिपुरातील महिलांच्या विटंबनेचा व हिंसाचाराचा धिक्कार केला.

सरकारकडून सुरू असलेल्या शांततेसाठीच्या प्रयत्नांमुळेच हळूहळू मणिपुरातील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे, असे त्यांनी सांगितले. आपल्या दीड तासाच्या भाषणात ‘देशवासी’ या अर्थाने ‘माझे कुटुंबीय’ या शब्दाचा त्यांनी 48 वेळा उल्लेख केला.

आपल्या कारकिर्दीतील दहाव्यांदा स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजवंदन मुख्य सोहळ्यात अनेक क्षेत्रांतील यशाबद्दल त्यांनी सार्‍यांचे अभिनंदन केले. घराणेशाही, भ्रष्टाचार आणि फाजील लाड हे देशाच्या राजकारणाला जडलेले तीन आजार असून, या त्रयीपासून जनतेने देशाला मुक्त करावे, असे आवाहनदेखील मोदी यांनी केले.

नाभिक, लोहार, सोनार, कुंभार, चर्मकारांसाठी योजना

भगवान विश्वकर्मा जयंतीनिमित्त 17 सप्टेंबर रोजी पारंपरिक कौशल्य असलेल्या कामगारांसाठी विश्वकर्मा योजना सुरू केली जाईल, अशी घोषणा पंतप्रधानांनी यावेळी केली. 13 ते 15 हजार कोटी रुपये या योजनेवर खर्च केले जातील. सोनार, लोहार, कुंभार, नाभिक, चर्मकार यांसारख्या पारंपरिक कौशल्य असलेल्या वर्गाला त्याचा लाभ देण्यात येईल.

मोदींची कविता

चलता चलाता कालचक्र
अमृतकाल का हालचक्र
सब के सपने अपने सपने
पनपे सपने सारे
धीर चले वीर चले
चले युवा हमारे
नीति सही रीति नई
गति सही राह नई
चुनो चुनौती सीना तान
जगमें बढाओ देश का मान

Back to top button