काहीच न मिळाल्याने चोरांनी घरमालकासाठी ठेवले 500 रुपये | पुढारी

काहीच न मिळाल्याने चोरांनी घरमालकासाठी ठेवले 500 रुपये

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : दिल्लीतील एका निवृत्त अभियंत्याच्या घरातील विचित्र प्रकाराच्या चोरीची घटना समोर आली. चोरी करण्यासाठी चोर घरात शिरले खरे, मात्र त्यांना घरात काहीच सापडले नाही. त्यानंतर त्या चोरांनी अभियंत्याच्या घराच्या दरवाजावर 500 रुपयांची नोट ठेवली आणि निघून गेले. घटनेची तक्रार नोंदवण्यासाठी पोलिस ठाण्यात पोहोचलेल्या अभियंत्यानेच ही माहिती दिली. हे प्रकरण रोहिणी सेक्टर-8 मधील असून 80 वर्षी निवृत्त अभियंते एम. रामकृष्ण पत्नीसह घरात राहतात. ही घटना 20 आणि 21 जुलैदरम्यानच्या रात्रीच्या वेळी घडली. 19 जुलै रोजी रामकृष्ण पत्नीसह गुरूग्राममध्ये राहणार्‍या मुलाला भेटायला गेले होते.

21 जुलै रोजी शेजार्‍यांनी त्यांना चोरीची माहिती फोनवरून दिली. त्यानंतर ते तत्काळ घरी परतले. त्यानंतर त्यांना मुख्य दरवाजाचे कुलूप तोडल्याचे दिसले. घरात गेल्यानंतर रामकृष्ण यांना चोर चोरी करू शकले नसल्याचे समजले. घरात काहीच मौल्यवान वस्तू नव्हती. घरातील कपाटही जसेच्या तसे होते. मात्र, मुख्य दरवाजाजवळ 500 रुपयांची नोट पडली असल्याचे दिसले.

Back to top button