Arvind Kejriwal: राजधानीतील कायदा-सुव्यवस्थेवर केजरीवालांचे केंद्रावर टिकास्त्र | पुढारी

Arvind Kejriwal: राजधानीतील कायदा-सुव्यवस्थेवर केजरीवालांचे केंद्रावर टिकास्त्र

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: राजधानी संदर्भातील वटहूकुमानंतर उफाळलेल्या केंद्र आणि दिल्ली सरकारमधील वाद आणखी शमलेला नाही. कायदा आणि सुव्यवस्थेवर आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चिंता व्यक्त करीत नायब राज्यपाल (एलजी) व्ही.के.सक्सेना यांना पत्र लिहले आहे. केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या दिल्लीच्या सुरक्षाव्यवस्थेवर एलजी आणि केंद्रीय गृहमंत्रालयावर केजरीवाल यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

दिल्लीच्या प्रत्येक नागरिकामध्ये असुरक्षिततेची भावना आहे. दिल्लीची कायदा-सुव्यवस्था थेट एलजी आणि गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे. नागरिक, आमदार आणि आरडब्ल्यूएसोबत मिळून कायदा-व्यवस्था सुधारण्यात यावी. पोलिस स्टेशन समिती पुन्हा कार्यान्वित करण्यात यावे, असे ट्विट केजरीवाल यांनी केले.

मुख्यमंत्र्यांनी एलजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप लावले. गेल्या २४ तासांमध्ये दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात चार हत्या झाल्या आहेत. या घटना दिल्लीत कायदा-सुव्यवस्थेची स्थिती सांगण्यासाठी पुरेसे आहे, असे केजरीवाल म्हणाले. दिल्लीच्या दोन कोटी नागरिकांनी दिलेल्या घटनात्मक जबाबदारीनुसार त्यांच्या जीवनाचे रक्षण करावे. कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी कुठलीही मदत करू, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. गत वर्षीच्या एनसीआरबी ची आकडेवारी केंद्रीय गृहमंत्रालय आणि एलजीचे डोळे उघडणारी आहे, असे केजरीवाल म्हणाले.

एनसीआरबी नुसार देशातील १९ शहरांपैकी एकट्या राजधानी दिल्लीत महिलांविरोधातील गुन्ह्यांचा आकडा ३२.२० टक्के आहे. यानंतर देखील कुठल्याही सुधारणा नसल्याचा दावा केजरीवाल यांनी केला. पोलीस कर्मचाऱ्यांचे अपुरे संख्याबळामुळे नागरिकांना आपल्या जीवाचे आणि संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी खाजगी सुरक्षा रक्षकांना ठेवावे लागत आहे. पोलिसांची रात्र गस्त आणि नागरिकांमध्ये समन्वय ही काळजी गरज आहे.अशात राज्य मंत्रिमंडळासोबत एक बैठक घेण्यात यावी, असे आवाहन पत्रातून केजरीवाल यांनी केले आहे.

हेही वाचा:

Back to top button