नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची हॅट्‌ट्रिक करणार : अमित शहा | पुढारी

नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची हॅट्‌ट्रिक करणार : अमित शहा

दिसपूर; वृत्तसंस्था : नरेंद्र मोदी हेच लागोपाठ तिसर्‍यांदा पंतप्रधान होतील आणि भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीत तीनशेहून अधिक जागा मिळतील, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला. ते एका जाहीर सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही जोरदार हल्लाबोल केला.

आसाममधील 44,703 उमेदवारांना सरकारी नोकरीची नियुक्ती पत्रे याप्रसंगी शहा यांच्या हस्ते देण्यात आली. ते म्हणाले, नकारात्मक मानसिकता ही काँग्रेसची खासियत आहे. आता तो पक्ष नव्या संसदेच्या उद्घाटनावरून निव्वळ राजकारण करत आहे. या पक्षाला आगामी सार्वत्रिक निवडणुकीत पन्नास जागासुद्धा मिळणार नाहीत. काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांत जेव्हा नव्याने विधानसभेची इमारत उभारण्यात आली, तेव्हा त्याचे उद्घाटन संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले नव्हते. त्याऐवजी हा मान सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांना देण्यात आला होता. मी तुम्हाला अशी अनेक उदाहरणे देऊ शकतो.

मोदींचा द्वेष करणे हेच काँग्रेसचे एककलमी राजकारण बनल्याचा टोला लगावून त्यांनी सांगितले की, काँग्रेसकडे विकासाची कसलीही द़ृष्टी नाही. त्यामुळेच फुटकळ मुद्दे पुढे करून तो पक्ष विरोधासाठी विरोध करताना दिसत आहे. आता आगामी लोकसभा निवडणुकीत देशातील जनताच या पक्षाला धडा शिकवेल.

काँग्रेस गोंधळलेला पक्ष

पंतप्रधान मोदी यांना संसदेत बोलूच द्यायचे नाही, असे काँग्रेसने ठरवल्याचा आरोपही शहा यांनी केला. ते म्हणाले, काँग्रेसला जनतेने दिलेला कौल मान्य नाही. त्यामुळे तो पक्ष गोंधळून गेला आहे. काँग्रेसला देश विकासापासून मागे नेऊन स्वतःचा अजेंडा रेटायचा आहे. मात्र, आम्ही त्यांना तसे करून देणार नाही. काँग्रेसचे राजकारण कशा पद्धतीने सुरू आहे, हे वेगळे सांगायला नको. काँग्रेसला लोकसभेत सध्या असलेल्या जागासुद्धा राखणे महाकठीण होणार आहे. याच्या उलट आम्ही विकासाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. आसामचा विकास भाजपच्या सरकारमुळेच वेगाने होत चालला आहे, असा दावाही शहा यांनी केला.

Back to top button