नवीन सीबीआय प्रमुख निवडीच्या हालचालींना वेग | पुढारी

नवीन सीबीआय प्रमुख निवडीच्या हालचालींना वेग

 नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय गुन्हे अन्वेषणच्या (सीबीआय) नवीन संचालकांच्या निवडीसाठी स्थापित उच्चस्तरीय समितीची बैठक लवकरच होण्याची शक्यता आहे. बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते उपस्थित राहतील. संभावित संचालक पदासाठीच्या नावावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

सीबीआयचे विद्यमान संचालक सुबोध कुमार जायस्वाल यांचा कार्यकाळ वाढला जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ २५ मे ला समाप्त होत आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोडा यांचे नाव सध्या चर्चेत आहे.त्यांच्या नावावर देखील बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र कॅडरचे १९८५ बॅचचे आयपीएस अधिकारी आणि मुंबई पोलीस दलाचे माजी आयुक्त जायस्वाल यांना २६ ते २०२१ रोजी सीबीआय प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली होती.सीबीआय तसेच ईडी संचालकांचा कार्यकाळाला पाच वर्षांपर्यंत सेवा विस्तार देण्यासंदर्भात गतवर्षी केंद्र सरकारने लोकसभा आणि राज्यसभेत केंद्र सरकारने कायदा पारित केला आहे.

केंद्राच्या या निर्णयाला विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.केंद्राचा निर्णय घटनाबाह्य असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. कॉंग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला, जया ठाकूर, टीएमसी खासदार मोहुआ मोइत्रा, साकेत गोखले, विनती नारायण, कृषण चंद्र सिंह आणि मनोहर लाल सिंह यांनी या याचिका दाखल केल्या आहेत.सीबीआय, ईडी संचालकाच्या कार्यकाळाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असल्याने सीबीआयप्रमुखांना कार्यकाळ विस्तार देण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button