सीमापार दहशतवादाला आळा घालणे गरजेचे: डॉ. एस. जयशंकर | पुढारी

सीमापार दहशतवादाला आळा घालणे गरजेचे: डॉ. एस. जयशंकर

पणजी: पुढारी वृत्तसेवा : दहशतवाद जगासमोरील महत्वाचे आव्हान आहे. सीमेपलीकडील दहशतवादाला आळा घालणे सर्वांनाच गरजेचे आहे, असे प्रतिपादन भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो झरदारी यांच्या उपस्थितीत आज (दि. ५) केले.

गोव्यात गुरूवारपासून सुरू झालेल्या दोन दिवशीय शांघाय सहकार्य बैठकीत आज सकाळी झालेल्या बैठकीत दहशतवाद या विषयावर भारत, पाकिस्तान, चीन व रशिया या देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची चर्चा झाली. यावेळी डॉ. जयशंकर यांनी भुत्तो यांच्या उपस्थितीत दहशतवाद जगासमोरील मोठे आव्हान असून सीमापार दहशतवादाला देखील आळा घालण्याची गरज असल्याचे परखड मत व्यक्त केले.
शांघाय सहकार्य बैठकीच्या दुसऱ्या दिवशी परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर बोलत असताना पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो, रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गे लेवरोव, चीनचे परराष्ट्रमंत्री किन गँग व इतर सदस्य देशांचे परराष्ट्रमंत्री उपस्थित होते.

‘जग सध्या कोरोना आणि त्याच्या परिणामांचा सामना करत आहे. मात्र, दहशतवादाचा धोका अव्याहतपणे सुरूच आहे. सीमापार दहशतवादासह कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचे कोणत्याही प्रकारे समर्थन होऊ शकत नाही, असा भारताचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या दहशतवादाला आळा घातलाच पाहिजे. दहशतवादाचा अद्याप पूर्णपणे समूळ नायनाट झालेला नाही. दहशतवादाला न्याय ठरवता येणार नाही. त्याला सर्व प्रकारात आळा घालण्याची गरज आहे. दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणाऱ्यांनाही आळा घालण्याची गरज आहे. सीमेपलीकडील दहशतवादासह सर्व प्रकारचा दहशतवाद थांबवण्याची गरज आहे, असे त्यांनी आपल्या भाषणात म्हटले.

‘एससीओ’च्या सुधारणा आणि आधुनिकीकरणाच्या मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली आहे. ही आनंदाची बाब आहे. इंग्रजी ही ‘एससीओ’ची तिसरी अधिकृत भाषा व्हावी, यासाठी सदस्य राष्ट्रांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन डॉ. एस जयशंकर यांनी यावेळी केले.

दरम्यान, बिलावल भुत्तो बैठकीत सहभागी होण्यासाठी येत असताना डॉ. जयशंकर यांनी त्यांचे स्वागत नमस्ते करून केले. यानंतर बिलावल यांनीही हात जोडून नमस्कार केला. त्यानंतर दोन्ही नेत्यांचे काही अंतरावर उभे राहून फोटो काढण्यात आले. फोटोसेशन पूर्ण झाल्यानंतर डॉ. जयशंकर बिलावल यांना काहीतरी सुचना करताना दिसत होते. आणि नंतर हात दाखवून त्यांना पुढे जाण्यास सांगताना दिसले.. यानंतर बिलावल भुत्तो यांनी छातीवर हात ठेवून आभार मानले.

हेही वाचा 

Back to top button