गोवा डेअरीतील गैरव्यवहार 14 जणांना भोवला | पुढारी

गोवा डेअरीतील गैरव्यवहार 14 जणांना भोवला

फोंडा; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील दूध उत्पादकांची शिखर संस्था असलेल्या गोवा डेअरीतील कथित गैरव्यवहारप्रकरणी अखेर सहकार निबंधकांनी बडगा उगारला. त्यात विद्यमान सहा संचालकांना अपात्र ठरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे ज्यांनी चार महिन्यांपूर्वी संचालकपदाचा राजीनामा दिला, त्या माधव सहकारी यांनाही अपात्र ठरवण्यात आले आहे. अपात्र केलेल्या आजी-माजी संचालकांची एकूण संख्या चौदा आहे. सहकार निबंधक विशांत गावणेकर यांनी हा निवाडा दिला. दरम्यान, सरकारने गोवा डेअरीवर शुक्रवारी सनदी अधिकारी पराग नगर्सेकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय प्रशासकीय समितीची नियुक्ती केली आहे.

कुडतरी येथील दूध संस्थेचे अध्यक्ष रमेश नाईक यांनी गोवा डेअरीतील कथित गैरव्यवहारासंबंधीची तक्रार 11 सप्टेंबर 2019 रोजी केली होती. या तक्रारीनुसार सहकार निबंधकांनी अधिकारी राजेश परवार यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. परवार यांनी चौकशी अहवाल गोवा डेअरीला 3 ऑगस्ट 2020 रोजी पाठविला होता. सहकार निबंधकांनी या गैरव्यवहार प्रकरणावरून आजी-माजी संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती व त्याची सुनावणी सुरू केली होती, त्याचाच परिपाक म्हणून गोवा डेअरीतील हे चौदा आजी-माजी संचालक अपात्र झाले.

विद्यमान सहा संचालक अपात्र

गोवा डेअरीच्या विद्यमान संचालक मंडळातील अध्यक्ष राजेश फळदेसाई तसेच विठोबा देसाई, गुरुदास परब, बाबूराव फट्टो देसाई, विजयकांत गावकर व उल्हास सिनारी यांचा समावेश आहे. दरम्यान, संचालक मंडळावरील चार महिन्यांपूर्वीच राजीनामा दिलेल्या अनुप देसाई तसेच माधव सहकारी यांच्यापैकी माधव सहकारी यांनाही अपात्र ठरवण्यात आले आहे. सध्या गोवा डेअरीवर संचालक म्हणून श्रीकांत नाईक, बाबू फाळो, उदय प्रभू व नितीन प्रभुगावकर हे चारच जण शिल्लक आहेत, त्यामुळे अल्पमतात आलेले मंडळ गोवा डेअरीवर राहू शकत नसल्याने सनदी अधिकारी पराग नगर्सेकर यांच्या अध्यक्षतेखाली गोवा सरकारने पशुसंवर्धन खात्याचे पशुचिकित्सक डॉ. रामा परब व लेखा खात्याचे अधिकारी संदीप परब पार्सेकर यांचा समावेश आहे.

उच्च न्यायालयात जाणार…

सहकार निबंधकांनी गोवा डेअरीच्या संचालकांना अपात्र ठरवले हे लोकशाहीविरोधी कृत्य असून या निवाड्याविरुद्ध आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. गोवा डेअरीवर प्रत्येकवेळी प्रशासक नेमल्यावर गोवा डेअरीचा व्यवसाय खालावला आहे. मागच्या काळात सत्तर हजारांवरून 40 हजारांवर गोवा डेअरीचे दूध आले. पण आम्ही संचालक मंडळाने ताबा घेतल्यावर गोवा डेअरीच्या दुधात वाढ झाली आहे. गोवा डेअरीवर हजारो दूध उत्पादक शेतकरी कुटुंब विसंबून आहेत. या दूध उत्पादकांना वार्‍यावर सोडण्यासारखी ही कृती असून गोवा डेअरी नफ्यात आली पाहिजे, म्हणून आम्ही वेळोवेळी निर्णय घेतले. पण या निर्णयालाच आता खो बसला असून ज्याप्रमाणे संजीवनी साखर कारखान्याची स्थिती झाली आहे, तीच स्थिती नजीकच्या काळात गोवा डेअरीची होईल, असे गोवा डेअरीचे अध्यक्ष राजेश फळदेसाई यांनी म्हटले आहे.

राजीनामा दिला तरीही अपात्र

गोवा डेअरीच्या संचालक मंडळाचा राजीनामा तरीही सहकार निबंधकांनी मला अपात्र ठरवले आहे. वास्तविक हे लोकशाहीविरोधी कृत्य असून गोवा डेअरीवर काम करताना मी आणि माझ्या सहकार्‍यांनी डेअरीचे हितच पाहिले. पण प्रशासकाच्या काळात गोवा डेअरीची जी हानी झाली, ती भरून कशी काढणार, असा प्रश्न माजी अध्यक्ष माधव सहकारी यांनी विचारला आहे.

Back to top button