गोवा: पीएफआय संबंधित एका संशयिताला अटक: ‘एनआयए’ची कारवाई | पुढारी

गोवा: पीएफआय संबंधित एका संशयिताला अटक: 'एनआयए'ची कारवाई

पणजी : पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) च्या कार्यकर्त्यांविरुद्ध राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) ने देशभर १७ ठिकाणी सोमवारी (दि.२४) रात्रीपासून छापासत्र सुरू केले आहे. गोव्यातील कुर्टी फोंडा येथील एका संशयिताच्या घरी छापा टाकून देश विरोधी कारवाया केल्याच्या आरोपाखाली एनआयएने एकाला ताब्यात घेतले आहे. तर अन्य एकाचा शोध सुरू असल्याचे समजते.

उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पंजाब व गोव्यासह विविध राज्यांमध्ये सुमारे १७ ठिकाणी एनआयएने छापासत्र सुरू करताना काही संशयितांना अटकही केली आहे.

२८ सप्टेंबर २०२२ रोजी केंद्र सरकारने पीएफआयए व त्याच्या संलग्न संघटनांवर बंदी घातल्यानंतर गोव्यात १० महिन्यांपूर्वी एनआयएने छापे टाकले होते. त्यावेळी फातोर्डा व वास्को या जागी छापे टाकण्यात आले होते. वास्को येथे पीएफआयचा महत्त्वाचा पदाधिकारी राहत असल्याचे त्यावेळी उघड झाले होते. मात्र, त्याने एनआयए पथकाला चकवा देऊन जागा बदलली होती.

गेल्या महिन्यात दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिनेश कुमार शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा न्यायाधिकरणाने पीएफआय व त्याच्या संलग्न संस्थांवर ५ वर्षांची बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय कायम ठेवला होता. गेल्या वर्षी छाप्यामध्ये पीएफआयशी कथित संबंध असलेल्या १५० हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले होते.

हेही वाचा 

Back to top button