साखरेचे उत्पादन ३.५ टक्क्यांनी घटण्याचा ‘इस्मा’ चा अंदाज | पुढारी

साखरेचे उत्पादन ३.५ टक्क्यांनी घटण्याचा 'इस्मा' चा अंदाज

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : चालू हंगामात साखरेचे उत्पादन ३.५ टक्क्यांनी घटून ३२.८ दशलक्ष टनांवर येण्याचा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोएिशनने (ISMA) व्यक्त केला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये हवामानात झालेला बदल तसेच अपुऱ्या पावसाचा परिणाम साखर उत्पादनावर होणार असल्याचे ‘इस्मा’ चे अध्यक्ष आदित्य झुनझुनवाला यांनी सांगितले.

ISMA कमी उत्‍पादनामुळे साखर निर्यातीवर येणार मर्यादा

कमी उत्पादनामुळे साखर निर्यातीवर मर्यादा येणार असून ब्राझील, थायलंड सारख्या देशांना त्यामुळे निर्यातीसाठी वाव मिळेल. उसाच्या वाढीच्या काळात अनेक भागात पुरेसा पाऊस झाला नाही, त्याचा परिणाम साखर उत्पादनावर होणार असल्याचे झुनझुनवाला म्हणाले. चालू हंगामात ३६.५ दशलक्ष टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज ऑक्टोबर २०२२ मध्ये ‘इस्मा’ने व्यक्त केला होता. त्यानंतर गत जानेवारी महिन्यात हा अंदाज कमी करुन ३४ दशलक्ष टनांवर आणण्यात आला होता. तर आता हा अंदाज 32.8 दशलक्ष टनापर्यंत कमी करण्यात आला आहे.

गत हंगामात महाराष्ट्रात १३.७ दशलक्ष टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा ते घटून १०.५ दशलक्ष टनांवर येण्याची शक्यता आहे. चालू हंगामात केंद्र सरकारने ६.१ दशलक्ष टन साखरेच्या निर्यातीची परवानगी दिली आहे. तथापि अंदाजापेक्षा कमी उत्पादन होणार असल्याने निर्यातीवर मर्यादा येतील, झुनझुनवाला यांनी सांगितले.

भारताची साखरेची वार्षिक गरज २७.५ दशलक्ष टन इतकी आहे. गत हंगामात देशातून ११.२ दशलक्ष टनाची विक्रमी साखर निर्यात करण्यात आली होती. भारत प्रामुख्याने इंडोनेशिया, मलेशिया, बांगलादेश, सुदान, सोमालिया, संयुक्त अरब आमिरात आदी देशांना साखरे निर्यात करतो.

हेही वाचा : 

 

 

Back to top button