भाजप विरुद्ध 400 जागांवर विरोधकांचा एकच उमेदवार? | पुढारी

भाजप विरुद्ध 400 जागांवर विरोधकांचा एकच उमेदवार?

नवी दिल्ली;  जाल खंबाटा :  2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी 400 जागांवर भाजप विरोधात विरोधकांचा एकच उमेदवार देण्याची तयारी चालवली असून सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्यासाठी या वर्षाच्या उत्तरार्धात एक एकता शिबिर घेण्याचा प्रस्तावही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मांडला आहे.

मागील आठवड्यापासून भाजप विरोधात एकजूट करण्यासाठी विरोधकांच्या हालचालींना वेग आला आहे. वेगवेगळ्या नेत्यांचे दिल्ली दौरे आणि बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. काँग्रेस, जेडीयू, आरजेडी, राष्ट्रवादी काँग्रेस, आप आदी पक्षांच्या नेत्यांनी एकत्र यावे यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्यासोबत तसेच ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल आणि माकपचे नेते सीताराम येच्युरी यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली; तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि काँग्रेस नेतृत्वासोबतही त्यांनी चर्चा करून भाजपच्या मुकाबल्यासाठी राष्ट्रीय पातळीवर आघाडी तयार करण्याबाबत अनेक सूचना पुढे आल्या.

देशातील 543 लोकसभा मतदारसंघांपैकी 370 ते 400 मतदारसंघांत भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांचा एकच उमेदवार देण्याचा प्रयत्न असावा यावर सगळ्यांचे सध्या तरी एकमत झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, त्यासाठी विविध विरोधी पक्षनेत्यांचे इगो दूर सारण्याचे आणि एकमेकांवर विश्वास ठेवण्याचे महत्त्वाचे काम करावे लागणार आहे. काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की, भाजपला हरवण्यासाठी काही तडजोडी करण्याचीही काँग्रेसची तयारी असल्याचे संकेतही पक्षाच्या नेत्यांनी नितीशकुमार, तेजस्वी यादव आणि शरद पवार यांना दिले आहेत. आघाडीतील ‘मोठा भाऊ आपणच’ या काँग्रेसच्या आधीच्या भूमिकेपासून ही पूर्णपणे वेगळी भूमिका आहे.

या बैठकीत राहुल गांधी यांनी नितीशकुमार यांना स्पष्टच सांगितले की, काही पक्षांसोबत आघाडी करण्यास स्थानिक काँग्रेस नाखूश राहील. बंडखोरीही होऊ शकते. पण भाजपला हरवण्यासाठी असा तगडा पर्याय उभा राहण्याची शक्यता असेल तर काँग्रेस त्या बंडखोरीकडे दुर्लक्ष करेल. राहुल गांधी यांनी थेट आप आणि तृणमूल काँग्रेस यांचे नाव घेतले नसले तरी रोख त्याच पक्षांकडे होता.
यावेळी नितीशकुमार यांनीही जास्तीत जास्त व्यापक अशी विरोधी पक्षांची आघाडी असावी, असे मत व्यक्त केले. आघाडी मजबूत झाली तरच 370 ते 400 जागांवर भाजपच्या विरोधात सर्व समन्वयाने एकच उमेदवार देता येईल आणि भाजपला धक्का देता येईल. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात, उत्तराखंड, हिमाचल, आसाम, गोवा, पंजाब, हरियाणा आणि कर्नाटकातील 175 जागा अशा आहेत, जेथे काँग्रेसचा थेट भाजपशी मुकाबला आहे. तेथे काँग्रेसने जोर लावला पाहिजे, अशी सूचना त्यांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

एकता शिबिर : विरोधी पक्षांच्या इतर नेत्यांसोबत बोलताना राहुल गांधी यांनी या वर्षात एक एकता शिबिर घेण्याची कल्पना मांडली आहे. या निमित्ताने सर्व विरोधक एका व्यासपीठावर येतील व निवडणुकीच्या आधी योग्य तो संदेश तळागाळापर्यंत पोहोचवता येईल, असे त्यांचे मत पडले. त्याला इतर नेत्यांनीही होकार दर्शवल्याचे सूत्रांनी सांगितले.

नितीशकुमार अघोषित निमंत्रक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नितीशकुमार यांची विरोधकांच्या आघाडीच्या निमंत्रकपदी निवड झाली नसली तरी ते अघोषित निमंत्रक असल्यासारखेच आहेत. आप, बीआरएस, तृणमूल आणि सपा या काँग्रेसशी सूर न जुळणार्‍या पक्षांसोबत बोलण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यावर काँग्रेस नेतृत्व तयार झाले आहे. सोनिया गांधी यांच्या विश्वासू काँग्रेस नेत्याने दिलेल्या माहितीनुसार नितीशकुमार हे त्यांच्या दीर्घ अनुभवामुळे व वैयक्तिक संबंधांमुळे जेडीएस, बिजू जनता दल, समाजवादी पार्टी, दक्षिणेतील प्रादेशिक पक्ष यांच्याशी चांगलया रितीने संवाद साधू शकतात.

Back to top button