कर्नाटक विधानसभा रणधुमाळी : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर | पुढारी

कर्नाटक विधानसभा रणधुमाळी : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा :  राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच पहिली यादी जाहीर करणार्‍या काँग्रेसने गुरुवारी 42 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. मागील विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेते सिद्धरामया यांनी लढवलेल्या बदामी मतदार संघातून बी. बी. चिमणकट्टी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर बहुप्रतिक्षित निपाणीतून काकासाहेब पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांची ही सहावी वेळ.

बेळगाव जिल्ह्यातील 18 मतदारसंघापैकी 9 मतदारसंघांतील उमेदवार काँग्रेसने पहिल्या यादीतून 25 मार्चरोजीच जाहीर केले होते. गुरुवारी दुसर्‍या यादीत आणखी चार मतदारसंघांचे उमेदवारी जाहीर करण्यात आले. त्यात निपाणीसह गोकाकमधून महांतेश कडाडी, कित्तूरमधून बाबासाहेब पाटील, सौंदत्तीतून विकास वैद्य यांचा समावेश आहे. एकूण 13 उमेदवारांची घोषणा झाली असून, आता जिल्ह्यातील बेळगाव उत्तर, दक्षिण, अथणी, रायबाग, अरभावी या मतदारसंघांतील उमेदवारी घोषत होणे बाकी आहे. बेळगाव उत्तरसाठी अधिक चुरस आहे.

इतर मतदारसंघ

शिगावी इथून बसवराज मुंबई यांच्याविरुद्ध निवडणूक लढवलेल्या विनय कुलकर्णी यांना धारवाड मधून उमेदवारी देण्यात आली आहे. जेडीएस सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या एस. आर. श्रीनिवास यांना गुब्बी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर एन वाय गोपाळकृष्ण यांना मोळकालमूर येथून उमेदवारी दिली आहे. एकूण 42 विधानसभा मतदार संघातून उमेदवारांची घोषणा केली असून उर्वरित 58 उमेदवारांच्या तिसर्‍या यादीची कसरत सुरू आहे. काँग्रेस हायकमांडकडे उमेदवारीसाठी लॉबिंग सुरू आहे. काही मतदार संघात इच्छुकांची संख्या जास्त असल्याने तोडगा काढून यादी तयार केली जाणार आहे.

Back to top button