प्रत्येक क्षेत्रातील महिलांची भागीदारी वाढली : पंतप्रधान नरेंद्र मोदी | पुढारी

प्रत्येक क्षेत्रातील महिलांची भागीदारी वाढली : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : प्रत्येक क्षेत्रातील महिलांची भागीदारी वाढली असून गेल्या नऊ वर्षात महिलांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने विकास झाला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वेबिनारच्या माध्यमातून केले. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या वतीने वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.

अनेक क्षेत्रात महिलांची शक्ती आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढलेली आहे, असे सांगत नरेंद्र मोदी म्हणाले की, जी २० संमेलनात महिलांच्या नेतृत्वाखाली होत असलेला विकास हा चर्चेचा एक प्रमुख मुद्दा राहणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात पंतप्रधान आवास योजनेसाठी ८० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर गत ९ वर्षात महिला स्वयंसहायता समुहांना ६.१५ लाख कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे.

अभियांत्रिकी, विज्ञान, तंत्रज्ञान, गणित आदी क्षेत्रातील महिलांचा सहभाग ४२ टक्क्यांपर्यंत वाढला असल्याचे सांगत ते म्हणाले की, स्वयंसहायता समूहांनी युनिकॉर्न बनणे ही काळाची गरज बनली आहे. अर्थसंकल्पात यादृष्टीने प्रयत्न करण्यात आले आहेत. ज्या कंपन्यांचे बाजारमूल्य १ अब्ज डॉलर्सच्या पुढे जाते व ज्या कंपन्या भांडवली बाजारात नोंदणीकृत नसतात, अशा कंपन्यांना ‘युनिकॉर्न’ असे म्हटले जाते. मुद्रा योजनेतील ७० टक्के लाभार्थी महिला आहेत. या योजनेचा लाभ घेत महिला आपल्या कुटुंबाचे उत्पन्न वाढवित आहेत. शिवाय देशासाठी याद्वारे नवीन आर्थिक संधी निर्माण होत आहेत. समानतेच्या दृष्टीने महिलांचा समाजातील आदर वाढणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे, असेही मोदी यांनी नमूद केले.

हेही वाचा : 

Back to top button