न्यूयॉर्क टाईम्सच्या ‘अजेंड्यावर’ केंद्रीय मंत्र्यांचे तोंडसुख | पुढारी

न्यूयॉर्क टाईम्सच्या 'अजेंड्यावर' केंद्रीय मंत्र्यांचे तोंडसुख

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – ‘न्यूयॉर्क टाईम्स’ हे भारताबद्दल ‘खोटा’ प्रचार करीत असल्याचा धक्कादायक आरोप केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी शुक्रवारी केला. काश्मीरमधील प्रेस स्वातंत्र्यासंबंधी वृत्तपत्राने लेख प्रकाशित केल्यानंतर ठाकूर यांनी यासंदर्भात ट्विट करीत तोंडसुख घेतले. न्यूयॉर्क टाईम्सने भारताबद्दल काहीही प्रकाशित करताना तटस्थतेचा दिखावा करणे बऱ्याचपूर्वी सोडले आहे. काश्मीरमध्ये प्रेसच्या स्वातंत्र्यावर एनव्हायटीमध्ये प्रकाशित तथाकथित लेख खोडसर तसेच कल्पनारम्य आहे. हा लेख भारत, भारतातील लोकशाही संस्थाने तसेच मूल्यांबद्दल ‘प्रचारतंत्रा’च्या एकमेव उद्देशाने प्रकाशित करण्यात आला आहे. हे वृत्तपत्र आणि त्यांच्यासारख्या आणखी काही परराष्ट्रीय मीडिया भारत तसेच लोकशाही पद्धतीने निवडून आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल खोटा प्रचार करीत आहे.हा खोटारडापणा दीर्घकाळापर्यंत टिकणार नाही, अशी भावना देखील ठाकूर यांनी व्यक्त केली.

काही परदेशी मीडिया भारत आणि पंतप्रधानांविरोधात गेल्या अनेक काळापासून खोटे बोलण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारतातील प्रेस स्वातंत्र्य इतर मूलभूत अधिकारांप्रमाणेच पवित्र आहे. भारताची लोकशाही आणि आम्ही अत्यंत परिपक्व आहोत, आम्हाला अशाप्रकारे अजेंडा चालवणाऱ्या मीडियापासून लोकशाहीचे व्याकरण शिकण्याची आवश्यकता नाही. अशात एनव्हायटीकडून पसरवण्यात आलेले ‘अत्यंत खोट’ निंदनीय आहे. भारतीय अशा मानसिकतेला भारतभूवर त्यांचा निर्णायक अजेंडा चालवण्याची परवानगी देणार नाही. असे त्यांनी म्हटले आहे.

Back to top button