बाळाला रुग्णालयातून कुत्र्याने नेले; आईदेखत लचके तोडले
जयपूर; पीटीआय : राजस्थानातील सिरोही येथील जिल्हा रुग्णालयातून एक महिन्याच्या बाळाला कुत्र्याने उचलून नेले. क्षयरोग कक्षात हे बाळ आईजवळ निजलेले होते. यादरम्यान कुत्रे आले आणि बाळाला उचलून नेले. आई कुत्र्यामागे धावली; पण उपयोग झाला नाही. कुत्र्याने तिच्यादेखत बाळाला फाडून खाल्ले.
बाळाचे वडील महेंद्र मीणा हे क्षयरोग कक्षात उपचारार्थ दाखल होते. कक्षाबाहेर आई (रेखा) बाळासह निजलेली होती. बाळाला कुत्र्याने तोंडात धरले व पळ काढला. वॉर्डाच्या बाहेर असलेल्या एका पाण्याच्या टाकीजवळ कुत्र्याने बाळाला ओरबडायला सुरुवात केली. बाळाची आई धावत आली, पण तिला उशीर झाला होता. सिरोहीचे आमदार संयम लोढा यांनी राजस्थान विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला असून, रुग्णालय प्रशासनाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.