सरत्या वर्षात सायबर हल्ल्यांमध्ये तब्बल ९५ टक्क्यांनी वाढ | पुढारी

सरत्या वर्षात सायबर हल्ल्यांमध्ये तब्बल ९५ टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सायबर हल्ल्यांचे सर्वाधिक लक्ष्य असलेल्या देशांत भारताचा समावेश असून वर्ष २०२२चा विचार केला तर सरत्या वर्षात सायबर हल्ल्यांमध्ये तब्बल ९५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सरकारी संस्थांच्या प्रणालीवर सायबर हल्ला करण्याबाबतची ही आकडेवारी असून त्यात खासगी क्षेत्रातील कंपन्या आणि संस्थांवरील सायबर हल्ल्यांचा समावेश नाही, असे ‘क्लाउडसेक एक्स’ नावाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मागील दोन वर्षांचा विचार केला तर ज्या देशांत सर्वाधिक सायबर हल्ले झाले, त्यात भारत, अमेरिका, इंडोनेशिया आणि चीन या देशांचा समावेश आहे. जगातील एकूण सायबर हल्ल्यांच्या आकडेवारीच्या तुलनेत वरील चार देशांतील सायबर हल्ल्यांचे प्रमाण ४० टक्के इतके आहे. संगणक प्रणाली हॅक करण्याचे प्रकार भारतात मोठ्या प्रमाणात होतात.

केवळ आर्थिक लाभासाठी सायबर हल्ले होतात असे नाही, तर एखाद्या राजकीय, धार्मिक आणि अन्य विषयासंदर्भातील गोष्टीला विरोध करण्यासाठी अथवा पाठिंबा देण्यासाठी सायबर हल्ले केले जातात. एकूण घटनांच्या तुलनेत रॅनसमवेअरच्या माध्यमातून सायबर हल्ला करण्याचे प्रमाण सहा टक्के इतके आहे. लॉकबिट हा रॅनसमवेअरचा सर्वात मोठा ऑपरेटर आहे. डेटा किंवा इतर माध्यमाद्वारे शिरकाव करुन सायबर हल्ले केले जातात, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button