थर्टी फस्टसाठी बिनधास्त या गोव्यात : किनारे फुलले; सर्व हॉटेल्स, गेस्ट हाऊस फुल्ल

थर्टी फस्टसाठी बिनधास्त या गोव्यात : किनारे फुलले; सर्व हॉटेल्स, गेस्ट हाऊस फुल्ल

पणजी : विठ्ठल गावडे, पारवाडकर :  चीन, जपान, दक्षिण कोरिया आदी देशात कोरोनाच्या नव्या विषाणूने थैमान घातलेले आहे. असे असले तरी जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या गोव्यात लाखो पर्यटक इयर एन्डिगचा आनंद घेताना दिसत आहेत. राज्यातील सर्वच पर्यटन स्थळे गजबजली आहेत. संध्याकाळच्या वेळी समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटक दिसत आहेत. किनारी भागांमध्ये तर पर्यटकांच्या वाहनांमुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे.

चीन व अन्य काही देशांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना गोव्यात त्याचा कसलाही परिणाम दिसत नाही. कोरोना व्हेरिएंटचा गोव्यातील पर्यटनावर परिणाम होईल का असा प्रश्न विचारल्यास, पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांकडून नाही असेच उत्तर मिळते.
ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी जगभरातील पर्यटक गोव्याला पहिली पसंती देतात. त्यामुळे देश-विदेशी पर्यटक व सेलिब्रेटी गोव्यात दाखल झाले आहेत. सनबर्न सारख्या संगीत महोत्सवासाठी देशभरातील युवक युवतींचा लोंढा उत्तर गोव्यातील किनारी भागात आलेला आहे.

गोव्याची लोक संख्या १५ लाख आहे. तर कोरोना कालावधीचा अपवाद वगळल्यास दरवर्षी ४० ते ४२ लाख पर्यटक गोव्यात येतात. वर्षअखेरीस लाखो पर्यटक गोव्याला भेट देतात. येथील फेसाळणारे समुद्र किनारे, शांत वातावरण, चांगल्या पायाभूत सुविधा यामुळे गोव्यात पर्यटकांचा ओढा वाढत आहे. पर्यटकांची ही गर्दी २ ते ३ जानेवारीपर्यंत असेल त्यानंतर ती कमी कमी होत जाणार आहे.

कोरोनाची कोणतीही भीती गोव्यात जाणवत नाही. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी देशातील आरोग्य मंत्र्यांशी आभासी पद्धतीने संवाद साधल्यानंतर लगेच त्याच दिवशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यासोबत, विविध खात्याचे सचिव, वरिष्ठ अधिकारी, आरोग्य खात्यातील वरिष्ठ, जिल्हाधिकारी, पोलिस प्रमुख यांची संयुक्त बैठक घेऊन कोरोना नियंत्रणासाठी सज्जतेचे आदेश दिले आहेत. मंगळवार, २७ रोजी प्रमुख सरकारी आणि खासगी इस्पितळांमध्ये कोरोना नियंत्रणासाठी हव्या त्या सुविधा आहेत का, याची पडताळणी करण्यासाठी मॉक ड्रील राबविण्यात आले होते. ऑक्सिजन, आयसीयू, बेड, व्हेंटिलेटर, कोरोना नियंत्रणासाठी लागणाऱ्या सुविधा उपकरणे यांची तपासणी केली.

गोवा सरकारने काही महिन्यांपूर्वी उत्तर गोवा जिल्हा इस्पितळ आणि गोमेकॉ बांबोळी येथे कोरोनाचे विषाणू तपासणारे जीनोम सिक्वेन्सी यंत्रणा बसवली आहे. यापूर्वी अशा प्रकारचे विषाणू तपासण्यासाठी नमुने पुण्याला पाठवावे लागत होते.

गोवा सरकारची तयारी पाहता कोरोना नियंत्रणासाठी आरोग्य खाते पूर्णपणे सक्षम असून, कितीही कोरोनाबाधित वाढले तरी त्यांच्यावर उपचार करण्याची क्षमता दक्ष ठेवण्यात आल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे.

विमानतळावर तपासणी

चीन, जपान, हाँगकाँग, दक्षिण कोरिया येथील नागरिक विमानातून आल्यानंतर त्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. ही चाचणी पुढील काही दिवस सुरूच जाणार आहे. त्यात संशयित आढळल्यास त्याला थेट इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.

गोव्यात कोरोना नियंत्रणात

सध्या गोव्यात दिवसाला २ ते ३ नवे कोरोनाबाधित सापडत असून तेवढेच बरेही होत आहेत. राज्यात सध्या सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या २६ आहे. गोव्यात ख्रिसमस व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर देशी आणि विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात आलेले असले तरी त्यांच्यात कोरोनाची भीती जराही दिसत नाही.

कोरोनाचा पर्यटनावर परिणाम नाही

सध्या तरी गोव्यात कोरोनाचे भय नाही किंवा पर्यटनावर कोरोनाचा परिणाम जाणवत नाही. राज्यात लाखो पर्यटक आले असून राज्यातील हॉटेल्स व गेस्ट हाऊस फुल्ल झाली आहेत. २ जानेवारी पर्यंत ही स्थिती कायम राहणार आहे, असे नीलेश शहा, अध्यक्ष टीटीएजी गोवा यांनी सांगितले.

गोमेकॉ सज्ज

गोमेकॉमध्ये कोरोना बाधितावर उपचार करण्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. कालच पडताळणी झाली आहे. गोमेकॉ सोबतच सुपर स्पेशलिटी इस्पितळात वेगळा विभाग सज्ज ठेवण्यात आला आहे, असे डॉ. जे. पी. तिवारी, अधिष्ठाता गोमेकॉ यांनी सांगितले.

आरोग्य खाते सक्रिय

राज्यात कोरोना सध्या नियंत्रणात आहे. ज्यांना थंडी, खोकला झालेला आहेत ते कोरोनाची चाचणी करत असल्यामुळे दिवसाला पाचशे ते सहाशे कोरोना चाचण्या होत आहेत. मात्र, कोरोनाबाधितांची संख्या अत्यल्प आहे. सध्या एक किंवा दोन असे नवे कोरोनाबाधित सापडत आहेत. गेले काही महिने कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. राज्यातील सर्व सरकारी इस्पितळे व आरोग्य केंद्रे कोरोनावर उपचार करण्यासाठी सज्ज आहेत, असे डॉ. गीता काकोडकर, आरोग्य संचालक यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news