Lok Sabha Election 2024 : तामिळनाडूत भाजप खाते खोलण्याचे संकेत | पुढारी

Lok Sabha Election 2024 : तामिळनाडूत भाजप खाते खोलण्याचे संकेत

देशातील पाचवे सर्वात मोठे राज्य असलेल्या तामिळनाडूमध्ये यावेळी कोणत्याही स्थितीत उत्तम कामगिरी करून दाखविण्यासाठी भाजपने आपली सारी ताकद पणाला लावली आहे. सुमारे 7.2 कोIndications to open BJP account in Tamil Naduटी लोकसंख्या असलेल्या या राज्यात 38 जिल्हे असून, लोकसभेच्या 39 जागा आहेत. यातील किमान चार ते पाच जागा जिंकण्याची अपेक्षा भाजपला आहे.

तामिळनाडूवर सातत्याने प्रादेशिक पक्षांनी हुकूमत गाजविल्याचे दिसून येते. राष्ट्रीय पक्षांना येथे फारसे स्थान नाही. राजस्थानमध्ये जसे आलटून-पालटून भाजप आणि काँग्रेस हे दोनच पक्ष सत्तेवर येतात, तसेच या राज्यात अद्रमुक आणि द्रमुक दर पाच वर्षांनी सत्तेवर मांड ठोकतात. द्रविडी संस्कृती हा गाभा असलेल्या या प्रदेशात छोटे पक्षही अतिशय प्रभावी ठरत आले आहेत. नेमकी हीच बाब हेरून भाजपने या लहान पक्षांची मोट बांधली आहे. 2019 मधील सार्वत्रिक निवडणुकीत द्रमुकने 39 पैकी 38 जागा जिंकल्या होत्या. याच्या उलट, 2014 मधील सार्वत्रिक निवडणुकीत अद्रमुकने 39 पैकी 37 जागांवर दणदणीत विजय मिळविला होता.

मोदींची नजर तामिळनाडूवर दक्षिणेचे द्वार मानले जाणार्‍या कर्नाटकमध्ये भाजपने अनेकदा सरकार स्थापन केले. तेथे लोकसभा निवडणुकीतही नेत्रदीपक यश मिळवले. मात्र, शेजारील तामिळनाडूमध्ये भाजपला अजून खातेही खोलता आलेले नाही. त्यामुळेच गेल्या चार महिन्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल सात वेळा तामिळनाडूला भेट दिली. त्यांच्या जाहीर सभा आणि रोड शोला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे भाजपच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, भाजपला तामिळनाडूमध्ये काही जागा जिंकण्यात यश आले, तर ती फार मोठी गोष्ट असणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजप, द्रमुकसह अन्य सात पक्ष एनडीएचे भाग होते. तरीही, द्रमुकने शानदार यश मिळवले. यावेळी द्रमुक स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरला आहे. ही संधी साधून एनडीएमध्ये सहभागी नऊ छोट्या पक्षांच्या मदतीने भाजपने राज्यातील जातीय समीकरणे भेदण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू केला आहे. कारण, या ठिकाणी वेगवेगळे जातीसमूह राजकारणाची दिशा आणि दशा निश्चित करतात. भाजपसाठी जमेची आणखी एक बाजू म्हणजे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई. त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून तामिळनाडूतील राजकीय जमिनीची मशागत चालवली आहे. आक्रमक प्रचार करून त्यांनी द्रमुक आणि अद्रमुक या दोन्ही तगड्या पक्षांना भाजपच्या अस्तित्वाची दखल घ्यायला भाग पाडले आहे. आगामी काळात ही रणनीती भाजपसाठी गेमचेंजर ठरू शकते.

तरुणाईला भाजपचे आकर्षण

तामिळनाडूतील मतदारांची एकूण संख्या 6.18 कोटी आहे. त्यापैकी सात लाख मतदार पहिल्यांदाचा आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या जाहीर सभांवेळी तरुणाईची जोरदार उपस्थिती असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे भाजपसाठी हे सुचिन्ह म्हटले पाहिजे. या तरुणाईला भाजपकडे आकर्षित करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई हेही जिवापाड मेहनत घेत आहेत. भाजप येथे 19 जागा स्वबळावर लढवित आहे. दिवंगत जयललिता यांचा भाचा टी. टी. व्ही. दिनकरन यांच्या अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघम या पक्षाला भाजपने दोन जागा सोडल्या आहेत. तसेच, एनडीए आघाडीतील अन्य छोट्या पक्षांना काही जागा देण्यात आल्या आहेत. हे छोटे पक्ष प्रस्थापितांना घाम फोडू शकतात.

या राज्यात भाजपचा पाया रुंदावत चालला आहे. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला एकही जागा जिंकला आली नाही हे खरे असले, तरी या पक्षाला 3.6 टक्के मते मिळाली होती. प्रसिद्ध रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी तर यावेळी तामिळनाडूमध्ये भाजपला दोन अंकी जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपने या राज्यात सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे स्थानिक विषय प्रचारात पुढे आणले आहेत. त्यामुळे मतदार पर्याय म्हणून भाजपचाही विचार करू लागल्याचे चित्र दिसते.

Back to top button