Direct Tax Revenue : चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कराच्या महसुलामध्ये उद्दिष्टापेक्षा 25 टक्के वाढ? | पुढारी

Direct Tax Revenue : चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कराच्या महसुलामध्ये उद्दिष्टापेक्षा 25 टक्के वाढ?

कोल्हापूर; राजेंद्र जोशी : भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदराचा लंबक 7 टक्क्यांच्या मागे-पुढे राहण्याचा अंदाज जागतिक पतमानांकन संस्थांनी वर्तवला असला, तरी देशाच्या प्रत्यक्ष कराच्या गंगाजळीमध्ये होणारी भरघोस वाढ लक्षात घेता अर्थव्यवस्था वेगाने कूच करीत असल्याचे संकेत मिळाले आहेत. चालू आर्थिक वर्षामध्ये प्रत्यक्ष कराचा महसूल करपरतावा वजा जाता अर्थसंकल्पीय उद्दिष्टापेक्षा तब्बल 25 टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी व्यक्त केला आहे. साहजिकच आगामी अर्थसंकल्पामध्ये (2023-24) प्रत्यक्ष कराचे उद्दिष्टही वाढणार आहे. (Direct Tax Revenue)

दिल्लीत आंतरराष्ट्रीय व्यापार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी गुप्ता यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. या करवाढीला करवसुली प्रक्रियेमध्ये करण्यात आलेल्या आमूलाग्र सुधारणा जबाबदार असल्याचा दावा करताना गुप्ता यांनी नजीकच्या काळात ऑनलाईन गेमिंग आणि बेटिंग या दोन व्यवहारांवर प्रत्यक्ष कर मंडळाचे बारकाईने लक्ष असल्याचा सूचक इशाराही दिला. (Direct Tax Revenue)

या व्यवहारांमध्ये होणार्‍या करचुकवेगिरीला आळा घालण्यासाठी लवकरच पावले उचलण्यात येतील, जेणेकरून कराच्या महसुलातही वाढ होणे अपेक्षित आहे, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे हे दोन घटक सध्या आयकर विभागाच्या स्कॅनरखाली आहेत. (Direct Tax Revenue)

केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये चालू वर्षी प्रत्यक्ष कराच्या महसुलाचे 14 लाख 20 हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. 10 नोव्हेंबर रोजी या उद्दिष्टापैकी 61.3 टक्के महसूल केंद्राच्या तिजोरीत जमा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही वाढ 30.60 टक्के इतकी असून महसुलाची एकत्रित रक्कम 10 लाख 54 हजार कोटी रुपये इतकी आहे. या करातून करदात्यांचा परतावा वगळता तिजोरीतील निव्वळ कराची जमा रक्कम 8 लाख 71 हजार कोटी रुपये इतकी होते. हे प्रमाण गतवर्षीच्या जमापेक्षा 26 टक्क्यांनी अधिक आहे. (Direct Tax Revenue)

दोन गोष्टींवर सरकारचे लक्ष (Direct Tax Revenue)

करचुकवेगिरी करणार्‍यांच्या मुसक्या बांधणे आणि प्रामाणिक करदात्याला करभरणा करताना प्रक्रिया अधिक सुलभ करणे या दोन गोष्टींवर केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांपासून लक्ष केंद्रित केले आहे. त्याची फलनिष्पत्ती होताना दिसत आहे. एका बाजूला अप्रत्यक्ष कराच्या (जीएसटी) महसुलाने मासिक सरासरी दीड लाख कोटींची मजल मारली असताना दुसर्‍या बाजूला प्रत्यक्ष कराच्या जमा महसुलातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. या वाढीने भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या गतीचे संकेत दिले आहेत.

गंगाजळीत मोठी वाढ

जागतिक पतमानांकन संस्थांनी काही महिन्यांपूर्वी भारतीय विकास दराची वाढ सरासरी साडेआठ टक्क्यांनी होईल, असे अनुमान काढले होते. गेल्या महिनाभरात त्यांनी सुधारित अंदाजामध्ये या वाढीचा दर सरासरी 7 टक्क्यांवर खाली आणून ठेवला असला, तरी सरकारच्या गंगाजळीमध्ये होणारी करांची वाढ लक्षात घेता अर्थव्यवस्था आपल्या 5 लाख डॉलर्स आकारमानाच्या उद्दिष्टाकडे वेगाने सरकत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Back to top button