World population : जगाने आज पार केला @ ८ अब्ज लोकसंख्येचा टप्पा | पुढारी

World population : जगाने आज पार केला @ ८ अब्ज लोकसंख्येचा टप्पा

पुढारी ऑनलाईन : मानवी इतिहासात आज पहिल्यांदाच पृथ्वीची लोकसंख्या ८ अब्ज झाली असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाने दिली आहे. जगाची लोकसंख्या (World population) सात अब्ज पूर्ण झाल्यानंतर तब्बल ११ वर्षांनी आज हा टप्पा पूर्ण झाला आहे. २० व्या शतकातील वाढीनंतर पुढे लोकसंख्या वाढीचा दर कमी होणार असल्याचे संकेत देखील संयुक्त राष्ट्रसंघाने दिले आहेत.

जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त (World population) सोमवारी प्रसिद्ध झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेल्या एका अहवालामध्ये म्हटले आहे की, जगाची लोकसंख्या ही २०३० मध्ये सुमारे ८.५ अब्जाचा टप्पा पार करेल. त्यानंतर २०५० मध्ये ९.७ अब्ज तर एकविसाव्या शतकात २१०० मध्ये १०.४ अब्ज इतकी जगाची लोकसंख्या होईल. जागतिक लोकसंख्या १९५० नंतर सर्वात कमी वेगाने वाढत आहे, २०२० मध्ये लोकसंख्या वाढीचा दर हा एक टक्क्यांपेक्षाही कमी झाला असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

World Population: २०५० पर्यंत निम्म्याहून अधिक वाढ ‘या’ देशांत केंद्रित

२०५० पर्यंत जागतिक लोकसंख्येतील निम्म्याहून अधिक वाढ केवळ आठ देशांमध्ये केंद्रित केली जाईल असेही या अहवालात नमून करण्यात आले आहे. यामध्ये काँगो, इजिप्त, इथिओपिया, भारत, नायजेरिया, पाकिस्तान, फिलीपिन्स आणि टांझानिया या देशांचा समोवेश असणार आहे. तसेच २०२३ मध्ये भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनण्याचा अंदाज देखील हा अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे.

या कालखंडात वाढली जगाची लोकसंख्या

जागतिक महामारी कोरोनाचा सर्वच घटकांवर प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष परिणाम झाला आहे. अजूनही याचे परिणाम लोकांवर होत आहेत. या काळात लोकसंख्यावाढीवर खूप परिणाम झाल्याचे विविध अभ्यास सांगत आहेत. मृत्यूदरात घट झाल्याने २०५० साली सरासरी जागतिक दीर्घायुष्य साधारणत: ७७.२ वर्षे असेल असा अंदाज वर्तवला आहे. जगभर कोरोना विषाणूमुळे गर्भधारणा आणि जन्मदरावर परिणाम झाला. सारासर विचार करता १९५० ते २०२२ या कालखंडात जगाची लोकसंख्या तब्बल तीनपटीने वाढल्याचे अभ्यासात स्पष्ट झाले आहे. १९६० च्या सुरुवातीला लोकसंख्या वाढीचा दर हा कमी झाला असं यूएन पॉप्युलेशन फंडच्या रेचेल स्नो यांनी सांगितले.

Back to top button