G-20 Summit : युक्रेन युद्ध रोखण्‍यासाठी सर्वांनी मिळून मार्ग काढावा : पंतप्रधान नरेंद्र मोदी | पुढारी

G-20 Summit : युक्रेन युद्ध रोखण्‍यासाठी सर्वांनी मिळून मार्ग काढावा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कोरोना आणि युक्रेन-रशिया युद्धामुळे जगभरातील अन्‍न पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. यामुळे जगभरात हाहाकार माजला असून, या प्रश्‍नांवर तोडगा काढण्‍यासाठी संयुक्‍त राष्‍ट्रही अपयशी ठरले. आता सर्वांनी मिळून युक्रेन युद्ध रोखण्‍यासाठी मार्ग काढायला हवा, असे आवाहन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. इंडोनेशियातील बाली येथे आयोजित G20 शिखर परिषदेमध्‍ये (G20 summit) ऊर्जा संरक्षण सत्रामध्‍ये ते बोलत होते.

मागील शतकामध्‍ये दुसर्‍या महायुद्धामुळे संपूर्ण जगावर संकट आले होते. यानंतर जगभरातील नेत्‍यांनी शांततेच्‍या मार्गाचा अवलंब केला. आता पुन्‍हा एकदा याचा मार्गाने जाण्‍याची वेळ आली आहे. यासाठी सर्वांनी प्रयत्‍न करण्‍याची गरज आहे, असेही यावेळी पंतप्रधान मोदी म्‍हणाले.

G-20 Summit : भारत वेगाने वाटचाल करणारी अर्थव्‍यवस्‍था

भारत ही जगातील एक सर्वात वेगाने वाटचाल करणारी अर्थव्‍यवस्‍था आहे. मात्र आम्‍ही ऊर्जा प्रतिबंधाला प्रोत्‍साहन देऊ इच्‍छित नाही. २०३०पर्यंत आम्‍ही निम्म्याहून अधिक वीज निर्मिती ही अक्षय स्‍त्रोतापासून करणार आहोत.कायमस्‍वरुपी अन्‍न सुरक्षेसाठी आम्‍ही नैसर्गिक शेतीला प्रोत्‍साहन देत आहोत. भारतीय बाजारात पारंपरिक आणि पौष्टिक खाद्यपदार्थ लोकप्रिय होत आहे. बाजरी सारख्या पिकामुळे कुपोषण आणि भूकबळीवर मात करता येईल, असा विश्‍वासही त्‍यांनी या वेळी व्‍यक्‍त केला.

 

 

Back to top button