मातृत्व जेव्हा देते नियतीलाही मात! बाळ जगात येते, आई असते कोमात!! | पुढारी

मातृत्व जेव्हा देते नियतीलाही मात! बाळ जगात येते, आई असते कोमात!!

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : शाफिया आणि तिचा पती हैदर दोघे मोटारसायकलवरून जात होते. शाफिया गर्भवती होती… अपघात झाला. सुमारे 7 महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातानंतर आजतागायत शाफिया दिल्लीतील एम्स रुग्णालयात ‘कोमा’मध्ये आहे. याच अवस्थेत तिने बाळाला जन्म दिला. कन्यारत्न झाले. विशेष म्हणजे, ‘नॉर्मल डिलिव्हरी’ झाली. शाफियाच्या सामान्य प्रसूतीमुळे डॉक्टरही थक्क आहेत. शाफिया गेल्या काही दिवसांपासून फक्त डोळे उघडू शकते. बोलत नाही किंवा बाकीचेही तिला काही समजत नाही.

अपघातानंतर शाफिया जगेल, असे डॉक्टरांनाही वाटत नव्हते. डॉक्टरांच्या मते, तसा ‘चान्स’ केवळ 10-15 टक्के होता; पण तिच्या मातृत्वाने जणू नियतीलाही मात दिली. अर्थात, आपण आई झाल्याचे तिला कळेनासे असणे, हीसुद्धा नियतीची कुरघोडीच. अपघातावेळी ती 40 दिवसांची गरोदर होती. शाफिया-हैदर हे यूपीतील बुलंदशहरचे रहिवासी. 31 मार्च दोघे मोटारसायकलवरून जात असताना शाफियाची ओढणी दुचाकीत अडकली. शाफिया पडली. डोक्याला इजा झाली. हैदरने तिला हॉस्पिटलमध्ये नेले. तेथून शाफियाला एम्समध्ये पाठविण्यात आले.

हेल्मेट असते तर ही वेळ ओढवली नसती

अपघातावेळी शाफियाच्या डोक्यात हेल्मेट असते, तर ही वेळ ओढवली नसती. ती तिच्या बाळाला जोजवू शकली असती, असे शाफियाची केस हाताळणारे डॉ. दीपक गुप्ता आवर्जून सांगतात.

हैदर घेतो 24 तास काळजी

शाफियाला नळीवाटे दूध दिले जाते. ती रोडावलेली आहे. पती हैदर तिची 24 तास काळजी घेतो. दूध आणि हैदरच्या प्रेमाच्या बळावर तिचा श्वास चाललेला आहे.

माझ्या 22 वर्षांच्या कारकिर्दीत अशाप्रकारची केस मी पहिल्यांदाच अनुभवली. एरव्ही, एक तर अ‍ॅबॉर्शन केले जाते वा बाळ पोटात दगावते.
– डॉ. दीपक गुप्ता, न्युरोसर्जन

Back to top button