Shiv Sena Symbol Freezes : शिवसेनेआधीही इंदिरा गांधींच्या काँग्रेसची दोन चिन्हे गोठवली होती; जाणून घ्या इतिहास | पुढारी

Shiv Sena Symbol Freezes : शिवसेनेआधीही इंदिरा गांधींच्या काँग्रेसची दोन चिन्हे गोठवली होती; जाणून घ्या इतिहास

पुढारी ऑनलाईन डेस्क : निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात गोठविले आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांना (ठाकरे गट आणि शिंदे गट) या चिन्हा वापर करता येणार नाही असे आयोगाने स्पष्ट केले आहे. शिवाय दोन्ही गटांना शिवसेना हे नाव देखील वापरता येणार नाही असा निर्णय देण्यात आला आहे. आता दोन्ही गटांना शिवसेना ऐवजी वेगळे नाव आणि वेगळे चिन्ह घ्यावे लागणार आहे. आगामी येऊ घातलेली विधानसभेच्या अंधेरी मतदारसंघातील पोटनिवडणूकीत आणि मुंबईच्या महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या दोन्ही गटाला धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव सुद्धा वापरता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोग जेव्हा अंतिम निर्णय घेईल तेव्हा कोणत्यातरी एका गटाला एखाद्यावेळेस मूळ ‘शिवसेना’ हे नाव आणि त्याचे ‘धनुष्यबाण’ चिन्ह पुन्हा मिळू शकते. मात्र हे सर्व निवडणूक आयोगाकडे दोन्ही गटाचे सर्व म्हणणे व कागदपत्रे तपासल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जावू शकतो.

पण, शिवसेनेच्या आधीही राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसचे निवडणूक तब्बल दोनवेळा चिन्ह गोठवण्यात आले होते. चला तर जाणून घेऊया रंजक राजकीय इतिहास…

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष काँग्रेस 137 वर्षांचा होत आहे. डिसेंबर 1885 मध्ये स्थापना झालेल्या काँग्रेसने 1951-52 च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत स्वातंत्र्यानंतरची पहिली निवडणूक लढवली. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस निवडणुकीच्या मैदानात उतरली होती. यामध्ये काँग्रेसचे निवडणूक चिन्ह दोन बैलांची जोडी होते. काँग्रेसने तेव्हा शेतकरी आणि ग्रामीण जनतेला डोळ्यासमोर ठेऊन हे निवडणूक चिन्ह घेतले होते, जेणेकरून या मतदारांशी बैल जोडीच्या माध्यमातून जोडले जावे. झालेही तसेच. जनमताला आपल्याकडे अकर्षीत करण्यात काँग्रेस यशस्वी ठरली.

1952 मध्ये काँग्रेसने या चिन्हावर प्रचंड बहुमताने निवडणूक जिंकली. यानंतर 1957, 1962 च्या निवडणुकीतही त्यांचा विजय झाला. नेहरूंच्या मृत्यूनंतर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. मात्र, 1965 साली भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान ताश्कंदमध्ये त्यांचे आकस्मिक निधन झाले. यानंतर जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. तत्कालीन काँग्रेस पक्षावर कामराज यांच्या नेतृत्वाखालील ‘सिंडिकेट’ गटाचे नियंत्रण होते.

1967 च्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला प्रथमच खडतर आव्हानाचा सामना करावा लागला. काँग्रेसला 520 पैकी 283 जागा जिंकता आल्या. त्यावेळची त्यांची ही खराब कामगिरी मनली गेली होती. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. पण काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेदाला सुरुवात झाली आणि त्यातूनच कुरघोडीच्या राजकारणाची ठिणगी पडली. अखेर 1969 मध्ये काँग्रेस फुटली. मूळ काँग्रेसचे नेतृत्व कामराज आणि मोरारजी देसाई यांनी केले आणि इंदिरा गांधी यांनी काँग्रेस (आर) नावाचा नवीन पक्ष स्थापन केला. मात्र, बहुतांश खासदारांचा पाठिंबा इंदिराजी गांधी यांना होता. ‘काँग्रेस’चा ताबा घेण्यावरून दोन्ही विरोधकांमध्ये तिव्र संघर्ष सुरू झाला. त्यातूनच काँग्रेस (ओ) म्हणजेच मूळ काँग्रेस आणि काँग्रेस (आर) हे दोन्ही पक्षांनी ‘बैलजोडी’ या निवडणूक चिन्हावर आपला दावा सांगितला.

जेव्हा हे प्रकरण भारताच्या निवडणूक आयोगाकडे पोहोचले तेव्हा त्यांनी काँग्रेसला (ओ)च्या पारड्यात निर्णय देत त्यांना बैलजोडीचे चिन्ह दिले. अशा स्थितीत इंदिराजी गांधी यांनी काँग्रेस (आर)साठी गाय-वासरू हे निवडणूक चिन्ह घेतले. मात्र, हे निवडणूक चिन्ह घेण्यापूर्वी इंदिराजींनी खूप विचार केला.

1971 च्या निवडणुकीत इंदिराजी गांधी यांचा काँग्रेस (आर) पक्ष गाय-वासरू चिन्ह घेऊन लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. इंदिरा गांधी यांनी त्यावेळी जोरदार प्रचार केला. जनतेही इंदिरा गांधी यांच्या बाजूने कौल दिला. काँग्रेस (आर)ने 44 टक्के मतांसह 352 जागा मिळाल्या. तर काँग्रेसच्या (ओ) गटाला केवळ 10 टक्के मते आणि 16 जागा मिळाल्या. अशा प्रकारे इंदिराजींच्या काँग्रेसला खऱ्या काँग्रेसचा दर्जा प्राप्त झाला.

1971 ते 1977 पर्यंत काँग्रेसने या चिन्हावर निवडणूक लढवली. पण राजकीय परिस्थिती पुन्हा बदलली. काँग्रेस पुन्हा एकदा फुटण्याच्या उंबरठ्यावर पोहचली. 1977 च्या निवडणुकीत इंदिरा गांधींचा दारूण पराभव झाला. त्यानंतर, त्यांच्या अनेक काँग्रेस सहकाऱ्यांना इंदिरा गांधींचे राजकीय अस्तित्व संपल्यासारखे वाटले. त्यामुळे काँग्रेसमध्ये इंदिरा गांधींविरोधात पुन्हा असंतोषाची परिस्थिती निर्माण झाली. ब्रह्मानंद रेड्डी आणि देवराज अर्स यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांना इंदिराजींना बाजूला करायचे होते.

अशा स्थितीत जानेवारी 1978 मध्ये इंदिराजींनी पुन्हा काँग्रेस फोडून नवा पक्ष स्थापन केला. त्याला काँग्रेस (आय) असे नाव दिले. याला त्यांनी खरी काँग्रेस म्हटले. या राजकीय घडामोडीचा परिणाम देश पातळीसह राज्यांतील राजकारणावर झाला. सर्वत्र काँग्रेसचे दोन तुकडे झाले. विरोधक सातत्याने इंदिरा गांधी आणि त्यांचे पुत्र संजय गांधी यांच्यावर जोरदार टीका करत होते. त्यातूनच गाय-वासरू हे निवडणूक चिन्ह काँग्रेससाठी देशभरात नकारात्मक निवडणूक चिन्ह म्हणून ओळख बनल्याचे अनेक राजकीय विश्लेषकांनी म्हटले. परिणामी यावेळी इंदिरा गांधींनी निवडणूक आयोगाकडे नवीन निवडणूक चिन्हाची मागणी केली. 1978 मध्ये काँग्रेस फुटल्यानंतर निवडणूक आयोगाने गाय-वासरू हे चिन्ह गोठवले.

काँग्रेसने नवे निवडणूक चिन्ह म्हणून हाताचा पंजा बनवल्याची कहाणीही रंजक आहे. इंदिरा गांधी या पीव्ही नरसिंह राव यांच्यासोबत आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. दिल्लीतील नवीन निवडणूक चिन्हाबाबत चर्चा करण्यासाठी तत्कालीन काँग्रेसचे सरचिटणीस बुटा सिंह निवडणूक आयोगाच्या कार्यालयात गेले होते. निवडणूक आयोगाने त्यांना हत्ती, सायकल आणि हाताचा पंजा यापैकी एक चिन्ह निवडण्यास सांगितले. यानंतर बुटासिंग संभ्रमात होते. याबाबत निर्णय घेण्यासाठी त्यांनी इंदिरा गांधींना फोन केला.

निवडणूक आयोगाने चिन्ह ठरवण्यासाठी 24 तासांचा अवधी दिला होता, म्हणजेच काँग्रेस कोणते चिन्ह निवडते हे दुसऱ्या दिवशी जाऊन आयोगाला सांगणे आवश्यक होते. जर तसे झाले नाही तर काँग्रेस (आय)ला कोणत्याही निश्चित चिन्हाशिवाय निवडणूक लढवावी लागणार होती. यावरून पक्षात चर्चा सुरू झाली. शेवटी इंदिरा गांधींच्या संमतीने हाताच्या पंजावर शिक्कामोर्तब करण्यात आला. अशा प्रकारे 1952 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर काँग्रेसला तिसऱ्यांदा नवे चिन्ह मिळाले.

Congress on Twitter: "Pranab Mukherjee, PV Narasimha Rao & Smt Indira Gandhi, 1983 https://t.co/0Ddcu3qMKk" / Twitter

दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा बुटा सिंग यांना निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जायचे होते, त्याआधी त्यांनी इंदिरा गांधींना फोन केला. फोनवर आवाज स्पष्टपणे ऐकू न आल्याने किंवा बुटा सिंग यांच्या बोलण्याच्या शैलीमुळे इंदिरा गांधींना हाताऐवजी हत्ती असे ऐकू आले. पण बुटा सिंग यांनी तिसरा पर्याय असे सांगतले तेव्हा त्यांनी (इंदिरा गांधी) नकार दिला. पण मी जे सांगत आहे तो हात आहे हत्ती नाही. खुला पंजा. हाताचा खुला पंजा. हे चिन्ह निवडले जावे, असे इंदिरा गांधींना बुटा सिंग वारंवार पटवून देण्याचा प्रयत्न करत होते. पण, चिडलेल्या इंदिराजींनी नरसिंह रावा यांना फोनचा रिसीव्हर दिला. डझनभर भाषांचे जाणकार नरसिंह राव यांना काही सेकंदातच बुटा सिंग यांचे उच्चार समजले. त्यांनी बुटा सिंग यांना फोनवर जोरात पंजा म्हणण्यास सांगितले. यानंतर त्यांनी फोनचा रिसीव्हर इंदिरा गांधी यांच्याकडे दिला. तेव्हा इंदिराजींनी पंजावर संमती दिली. काँग्रेसला हाताच्या पंजाचे चिन्ह मिळाले, जे पहिल्या निवडणुकीत ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक (रुईकर गट)चे फोते. मात्र त्यानंतर त्या चिन्हाचा वापर कोणत्याही पक्षाने केला नाही, अखेर ते काँग्रेस (आय)चे निवडणूक चिन्ह बनले.

1980 मध्ये इंदिरा गांधी आणि काँग्रेससाठी हाताचे चिन्ह हिट ठरले. प्रचंड बहुमताने निवडणूक जिंकून इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्या. इंदिराजींनी नाकारलेले चिन्ह सायकल आणि हत्ती नंतर उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष या दोन पक्षांना देण्यात आले. या दोन्ही पक्षांची यूपीत सत्ता आली.

Back to top button