Car Thieft : ५ हजार गाड्यांची चोरी, खून, ३ पत्नी अन् बरंच काही, देशातील सर्वात मोठ्या कारचोराला अटक | पुढारी

Car Thieft : ५ हजार गाड्यांची चोरी, खून, ३ पत्नी अन् बरंच काही, देशातील सर्वात मोठ्या कारचोराला अटक

पुढारी ऑनलाईन : भारतातील सर्वात मोठ्या कार चोराला अटक करण्यात दिल्ली पोलिसांना यश आले आहे. गेल्या २७ वर्षांपासून कार चोरी करणारा कुख्यात चोर अनिल चौहान याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. देशाच्या विविध भागातून त्याने ५ हजारांहून अधिक कार चोरल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या ५२ वर्षीय अनिल चव्हाणची दिल्ली, मुंबई आणि भारताच्या ईशान्य भागात मालमत्ता असून त्याची भव्य अशी जीवनशैली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल चौहान हा 1995 पासून देशाच्या विविध भागातून गाडी चोरी करणाऱ्या चोरणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. या टोळ्यांच्या माध्यमातून, अनिल चौहान याने ५ हजारहून अधिक गाड्या चोरल्या आहेत. याव्यतिरिक्त त्याच्यावर शस्त्रास्त्र कायदा आणि तस्करीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. याआधीही अनिलला अनेकदा अटक केली असून तो बराच काळ तुरुंगातही होता. असे पोलीसांकडून सांगितले आहे.

अनिल चौहान हा मूळचा आसाममधील तेजपूरचा रहिवासी असून तो 1990 मध्ये दिल्लीत आला. यानंतर तो दिल्लीच्या खानपूर एक्स्टेंशन परिसरात राहू लागला. येथे आल्यानंतर तो आपला उदरनिर्वाह करण्यासाठी ऑटोरिक्षा चालवत असे, मात्र काही वर्षांनी तो हळूहळू पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या जगात ओढला गेला. 1995 नंतर त्याने गाड्या चोरायला सुरुवात केली. अनिल चौहान याला तीन पत्नी आणि सात मुले आहेत. अनिल चौहान हा देशाच्या विविध भागांतून गाड्या चोरून नेपाळ, जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील राज्यांत पाठवायचा. चोरीवेळी त्याने काही टॅक्सी चालकांचीही हत्या केली, असल्याचे पोलिसांनी सांगितले.

देशी बनावटीचे पिस्तूल, काडतुसे जप्त

दिल्ली पोलिसांनी आरोपी अनिल चौहानला अवैध देशी बनावटीचे पिस्तूल, दोन काडतुसे आणि चोरीच्या मोटारसायकलसह अटक केली आहे. तपासादरम्यान त्याच्याकडून आणखी पाच देशी बनावटीची पिस्तूल, पाच काडतुसे आणि चोरीची कारही जप्त करण्यात आली आहे.

अनिलला अनेक वेळा अटक करण्यात आली होती. २०२० मध्ये त्याची सुटका झाली होती. त्याच्यावर १८० गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिलच्या तीन पत्नी असून त्याला सात मुले आहेत. तो आसाममध्ये सरकारी कंत्राटदार बनला होता आणि तेथील स्थानिक नेत्यांच्या तो संपर्कात होता.

Back to top button