

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबरला मतदान तर १९ ऑक्टोबरला मतमोजणी होईल, असे पक्षाने स्पष्ट केले आहे. ( Congress President Election ) या पदासाठी इच्छूकांची संख्या वाढली आहे. पक्षातील नाराज नेत्यांचा सूर पाहता या निवडणुकीत २५ वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती होईल, असे मानले जात आहे.
पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर आरोप करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली. यानंतर अध्यक्ष निवडीच्या हालचालींना वेगला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक झाली. यामध्ये अध्यक्ष निवडणूक घेण्यावर शिक्कामोर्तब झाले. सोनिया गांधी यांच्या कुटुंबातील कोणतीही सदस्य ही निवडणूक लढविणार नाही, असे संकेत मिळत आहेत. पुन्हा पक्षाध्यक्ष होण्यास राहुल गांधी यांनी नकार दिला आहे. आता अशी चर्चा आहे की, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि राजस्थानचे युवा नेते सचिन पायलट यांना पक्षश्रेष्ठींची पसंती असल्याची चर्चा आहे. केरळ, कर्नाटकमधील काही नेत्यांचाही नावाची चर्चा सुरु आहे. अनेक नेते हे अध्यक्षपदासाठी इच्छूक असल्याचे मानले जात आहे.
अध्यक्षपदाची निवडणूक ही लोकशाही पद्धतीने होईल, असे पक्षाने जाहीर केले आहे. त्यामुळे आता पक्षातील नाराज
नेत्यांना निवडणुकीपासून लांब ठेवता येणार नाही, हेही स्पष्ट झाले आहे. किती उमेदवारी अर्ज दाखल होतात यावर निवडणुकीतील चुरस स्पष्ट होईल. कारण उमेदवार अर्ज दाखल करुन तो शेवटपर्यंत कायम ठेवणे हे महत्त्वाचे असणार आहे. नाराज नेते हे निवडणूक प्रक्रियेत उतरुन आपले अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
१९९७ मध्ये काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली होती. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेश पायलट यांनी थेट पक्षाच्या विरोधातच भूमिका घेत पक्षाध्यक्ष पदावर दावेदारी केली होती. यावेळी निवडणूक रिंगणात सीताराम केसरी, राजेश पायलट आणि शरद पवार उतरले होते. सीताराम केसरी यांना गांधी कुटुंबीयांचे समर्थन होते. अखेर सीताराम केसरी हे काँग्रेसचे
अध्यक्ष झाले. यानंतर २००० साली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र पसाद यांनी बंडखोरी करत अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवली. त्यांनी थेट सोनिया गांधी यांनाच आव्हान दिले होते. या निवडणुकीत सोनिया गांधी यांचा विजय झाला होता.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशि थरुर यांनी मल्याळम दैनिकातील लेखात काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर भाष्य केले आहे. ही निवडणूक स्वतंत्र आणि पारदर्शीपणे व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ते अध्यक्षपदाची निवडणूक लढवतील, अशी चर्चा सुरु झाली आहे. थरुर हे काँग्रेसमधील जी-23 (नाराज नेत्यांचा गट) मध्ये सहभागी होते. हा गट नेहमीच पक्षात संघटनात्मक बदलाची मागणी करत आला आहे.
पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी अध्यक्ष निवडीवर काही प्रश्न केले होते. त्यांनी
म्हटलं होतं की, तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर निवडणूक होत नाही. अध्यक्षपदासाठी किती मतदान आहे याचीही माहिती दिली जात नाही. यावर सोनिया गांधी यांनी काँग्रेस निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांना या प्रश्नी लक्ष देण्याचे आदेश दिले होते. माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनीही पक्षश्रेष्ठींवर टीका करत अध्यक्षपदाची निवडणूक पारदर्शीपणे कशी घेणार ? असा सवाल केला होता.
ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ माजली आहे. आज ( दि. ३१) रोजी हिमाचल प्रदेशमध्ये आयोजित बैठकीकडे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी पाठ फिरवली. त्यांनी २१ ऑगस्ट रोजी हिमाचल प्रदेश काँग्रेस संचालन समिती अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी मागील पाच दिवसांमध्ये दोन वेळा गुलाब नबी आझाद यांची भेट घेतली आहे. या नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली असून, आता नाराज नेते गुलाब नवी आझाद यांच्या पक्षात सहभागी होणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.