Congress Leaders Resign : आझाद यांच्यानंतर आणखीन तीन नेत्यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी! | पुढारी

Congress Leaders Resign : आझाद यांच्यानंतर आणखीन तीन नेत्यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी!

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर पक्षात राजीनाम्याचे पेव फुटले आहे. सोमवारी आणखी तीन काँग्रेस नेत्यांनी पक्ष सोडला (Congress Leaders Resign). माजी उपसभापती गुलाम हैदर मलिक यांच्यासह आणखी तीन काँग्रेस नेत्यांनी सोमवारी आझाद यांच्या समर्थनार्थ पक्षाच्या सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री 73 वर्षीय गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी (दि. 26) पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सर्व पदांचा राजीनामा दिला होता. अंतर्गत निवडणुकीच्या नावाखाली काँग्रेस नेतृत्व फसवणूक करत असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यांनी राहुल गांधी यांच्यावर ‘अपरिपक्व आणि बालिश’ वर्तनाचा आरोपही केला होता. (Congress Leaders Resign in jammu and kashmir)

दरम्यान, सोमवारी (दि. 29) कठुआच्या बानी विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार मलिक आणि दोन माजी आमदारांनी (कठुआचे सुभाष गुप्ता आणि डोडा येथील शाम लाल भगत) यांनी स्वतंत्रपणे पक्षाच्या उच्चाधिकार्‍यांना राजीनामे पाठवले आहेत. आझाद यांचे निकटवर्तीय आणि माजी मंत्री जीएम सरोरी यांनी, ‘आम्हाला मलिक, गुप्ता आणि भगत यांच्याकडून (समर्थनाची) पत्रे मिळाली आहेत, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, आझाद यांनी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री तारा चंद, माजी मंत्री अब्दुल मजीद वाणी, मनोहर लाल शर्मा आणि घारू राम आणि माजी आमदार बलवान सिंग यांनी त्यांची दिल्लीत भेट घेतली. हे सर्व नेत मंगळवारी आझाद याच्यासोबत जाणार असल्याचे जाहीर करतील, अशी माहिती एका सूत्राने दिली आहे. (Congress Leaders Resign in jammu and kashmir)

याशिवाय, जम्मू आणि काश्मीरमध्येही काँग्रेसला रविवारी आणखी एक धक्का बसला. तेथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री ताज मोहिउद्दीन यांनी पक्ष सोडला आणि गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखालील आघाडीत सामील होत असल्याची घोषणा केली. मोहिउद्दीन यांनी मात्र आझाद यांच्या नेतृत्वाखालील गट भारतीय जनता पक्ष (भाजप) सोबत युती करणार नसून नॅशनल कॉन्फरन्स किंवा पीडीपीशी युती करणार असल्याचे स्पष्ट केले. मोहिउद्दीन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘मी काँग्रेस अध्यक्षांसह पक्षाचे सरचिटणीस आणि इतरांना पत्राद्वारे राजीनामा पाठवला आहे. मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह माझ्याकडे असलेल्या सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे मी कळवले असल्याचे त्यांनी सांगितले. राजीनाम्यानंतर मी आझाद यांच्या नेतृत्वाखालील पक्षात प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. (Congress Leaders Resign in jammu and kashmir)

Back to top button