काश्मिरी पंडिताच्या हत्येनंतर आणखी मोठी एक घटना, जम्मूतील घरात सहाजण मृतावस्थेत आढळले | पुढारी

काश्मिरी पंडिताच्या हत्येनंतर आणखी मोठी एक घटना, जम्मूतील घरात सहाजण मृतावस्थेत आढळले

जम्मू; पुढारी ऑनलाईन : जम्मू मधील सिधरा भागात राहत्या घरी सहाजण मृतावस्थेत आढळले आहेत. एका घरात दोन, तर दुसऱ्या घरात चार मृतदेह सापडले आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती जम्मू- काश्मीर पोलिसांनी दिली आहे. या सहाजणांचा मृत्यू नेमक्या कशामुळे झाला आहे, याचा तपशील अद्याप मिळालेला नाही. सकीना बेगम, त्यांच्या दोन मुली नसीमा अख्तर आणि रुबीना बानो, मुलगा जफर सलीम आणि दोन नातेवाईक नूर उल हबीब आणि सजाद अहमद अशी मृतांचा नावे आहेत. या सहाजणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

सर्वांचे मृतदेह जम्मूच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नेण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याआधी मंगळवारी जम्मू आणि काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील छोटीपोरा भागातील सफरचंदाच्या बागेत दहशतवाद्यांनी एका काश्मिरी पंडिताची गोळ्या झाडून हत्या केली होती आणि त्याचा भाऊ गंभीर जखमी झाला होता. सुनील कुमार भट असे मृताचे नाव आहे. त्याचा भाऊ पिंटू जखमी झाला आहे. या घटनेनंतर या परिसरात सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

हे ही वाचा :

Back to top button