राहुल यांची बदलती प्रतिमा | पुढारी

राहुल यांची बदलती प्रतिमा

आलोक मेहता

काळाबरोबर बदलणे हा मानवी स्वभावधर्म आहे. राजकीय पक्ष आणि नेत्यांनाही तो लागू पडतो. राहुल गांधी यांनीही तोच कित्ता गिरवायला सुरुवात केली असून, कुर्ता-पायजामा हा जुना वेश अडगळीत टाकून ते दिवसेंदिवस आधुनिक बनत चालले आहेत. केवळ वेशच नव्हे, तर जुनाट विचार मागे टाकून काँग्रेस पक्षालाही तुकतुकी देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. कोणत्याही विषयावर त्यांच्या भूमिकेत आलेली लवचिकता ही त्याचीच साक्ष आहे.

राहुल गांधी यांचा जुना फोटो आताच्या काळात दृष्टीला पडला, तर क्षणभर त्यावर विश्वासच बसणार नाही. आधी ते कुर्ता पायजमा अशा वेशात असायचे. आता त्याची जागा जीन्स आणि टी शर्ट या आधुनिक पेहरावाने घेतली आहे. रायबरेलीत ते जेव्हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झाले, त्याच्या आधी विमानतळावर त्यांनी हास्यविनोद केले. दिवसेंदिवस ते प्रगल्भ होत चालल्याचे ठळकपणे जाणवू लागले आहे. माध्यमकर्मी त्यांच्या पुढे-मागे करत होते, तेव्हासुद्धा त्यांनी केवळ धन्यवाद या एकाच शब्दात सगळा विषय संपवून टाकला. वेगाने चालणे, पोहणे आणि पॅरा ग्लायडिंग हे त्यांच्या आवडीचे विषय. इंदिरा गांधी यांच्या काळातील काँग्रेस पक्ष आणि राहुल यांच्या काळातील पक्ष आमूलाग्र बदलून गेल्याचे दिसून येते. हे परिवर्तन त्यांनी घडवून आणले आहे. 2019 मधील लोकसभा निवडणुकांत पराभव पत्करावा लागल्यानंतर राहुल यांनी पक्षात कोणतीही जबाबदारी स्वीकारण्याऐवजी आपले खास नेते आणि सहकारी यांच्या मदतीने काँग्रेसला नवे रूप देण्याचा प्रयत्न चालविला आहे. धर्म आणि जात याच्या पलीकडे जाऊन मानवतावादी दृष्टिकोनातून पक्षकार्य करण्यावर त्यांनी भर दिला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून राहुल यांनी जातनिहाय जनगणना आणि मुस्लिमांसाठी स्वतंत्र आरक्षण हे मुद्दे लावून धरले आहेत. रायबरेलीतून उमेदवारी दाखल केल्यानंतर त्यांच्या सहकार्‍यांनी त्यांची प्रतिमा भावी पंतप्रधान म्हणून तयार करण्याचे प्रयत्न आरंभले आहेत.

कटुता टाळण्यावर भर

राहुल यांच्यातील आणखी एक बदल म्हणजे भूमिकेतील लवचिकता. दिल्लीत त्यांनी आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याशी जागावाटप करताना पडती भूमिका घ्यायला मागे-पुढे पाहिलेले नाही. वास्तविक 2014 मध्ये काँग्रेसच्या दारुण पराभवाला आम आदमी पक्षदेखील कारणीभूत होता. मात्र, त्या कडवट गोष्टी बाजूला ठेवून राहुल यांनी केजरीवाल यांच्यापुढे सहकार्याचा हात पुढे केला, हेही लक्षात घेतले पाहिजे. या निर्णयावरून पक्षात काहीशी अस्वस्थता असली, तरी राहुल यांनी त्याची तमा बाळगलेली नाही, हे उल्लेखनीय म्हटले पाहिजे.

2014 मधील सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी मुलाखतीत सांगितले होते की, प्रियांका माझी केवळ बहीण आहे असे नसून ती राजकारणातील सहकारी आणि मैत्रीणसुद्धा आहे. आम्ही जबाबदार्‍या वाटून घेतो आणि विविध विषयांवर मतांचे आदान-प्रदान करतो. राहुल यांनी अमेठीऐवजी रायबरेलीतून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर तो चर्चेचा विषय बनला असला, तरी 2009 मध्येच त्यांनी आपल्या अन्य सहकार्‍यांकडे अमेठीची जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे किशोरी लाल शर्मा यांच्यासारख्या जुन्या-जाणत्या नेत्याला अमेठीची उमेदवारी देण्यात आली. आता त्यांच्यासाठी प्रियांका गांधी-वधेरा प्रचार करणार आहेत.

Back to top button