Target Killing In Kashmir : 177 काश्मिरी पंडित शिक्षकांच्‍या सुरक्षित ठिकाणी बदल्‍या | पुढारी

Target Killing In Kashmir : 177 काश्मिरी पंडित शिक्षकांच्‍या सुरक्षित ठिकाणी बदल्‍या

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :

जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये दहशतवाद्‍यांच्‍या टार्गेटवर असलेल्‍या काश्मिरी पंडितांच्‍या सुरक्षेसाठी ( Target Killing In Kashmir ) सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. श्रीनगर जिल्‍ह्यात विविध ठिकाणी तैनात असणार्‍या १७७ काश्मिरी पंडित शिक्षकांच्‍या श्रीनगर मुख्‍यालयात बदली करण्‍यात आली आहे. यासंदर्भातील माहिती श्रीनगरमधील मुख्‍य शिक्षण अधिकार्‍यांनी एका पत्राव्‍दारे दिली आहे.

Target Killing In Kashmir : केंद्रीय गृहमंत्रालयाच्‍या बैठकीनंतर निर्णय

जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये मागील काही दिवसांपासून काश्मिरी पंडितदहशतवाद्‍यांच्‍या टार्गेटवर आहेत. याची गंभीर दखल केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतली. यासंदर्भात शुक्रवारी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्‍या अध्‍यक्षतेखाली उच्‍चस्‍तरीय बैठक झाली. यावेळी दहशतवादी हल्‍ले होणार्‍या परिसरातून संबंधित शिक्षकांची सुरक्षित ठिकाणी बदली करण्‍यात यावी, असा निर्णय घेण्‍यात आला होता.

मागील काही दिवसांपासून काश्मिरी पंडित नागरिक दहशतवाद्‍यांचे हल्‍ले वाढले आहेत. यांचा तीव्र निषेध होत आहे.
काश्मिरी पंडित नागरिकांनी सुरक्षित स्‍थळी हलविण्‍याची मागणी केली होती. तसेच जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत कामावर रुज होणार नसल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले होते. काश्‍मीरी पंडित शिक्षक आणि सरकारी कर्मचार्‍यांना काश्‍मीर खोर्‍यातील अधिक सुरक्षा असणार्‍या ठिकाणीच नियुक्‍त केले जाईल. तसेच शिक्षकांच्‍या सुरक्षेसाठी अतिरिक्‍त सुरक्षा व्‍यवस्‍था पुरवली जाईल, असे सरकारी सूत्रांनी स्‍पष्‍ट केले आहे.

शोपियानमध्‍ये कामगारांवर ग्रेनेड हल्‍ला, दोन जखमी

दक्षिण काश्‍मीरमधील शोपियानमध्‍ये शुक्रवारी रात्री परप्रांतीय कामगारांना टार्गेट करण्‍यात आले. ग्रेनेड हल्‍ल्‍यात दोन कामगार जखमी झाले. या हल्‍ल्‍यानंतर परिसरात शोधमोहिम राबविण्‍यात आली. मागील दोन दिवसांमधील ही सलग दुसरी घटना असल्‍याने परप्रांतीय कामगारांमध्‍ये दहशत पसरली आहे.

 

 

 

 

Back to top button