Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू यांच्या प्रेमाची अनोखी गोष्ट; हुड्यांत नवऱ्याकडून… | पुढारी

Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू यांच्या प्रेमाची अनोखी गोष्ट; हुड्यांत नवऱ्याकडून...

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) या निवडूण आल्या आहेत. त्या देशातील पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. अत्यंत दुर्गम अशा आदिवासीपाड्यातून आणि आदिवासी समाजातून येणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांचा त्या काळी प्रेम विवाह झाला होता. तसेच या विवाहात त्यांनी चक्क होणाऱ्या नवऱ्याकडून हुंडा म्हणून एक गाय, एक बैल आणि १६ जोड कपडे घेतले होते. एक सामान्य आदिवासी कुटुंबातील मुलगी ते शिक्षिका आणि तेथून राष्ट्रपती बनण्याचा त्यांचा प्रवास हा सर्वांनाचा थक्क करणारा आहे. तसेच हा त्यांचा प्रवास त्यांच्यासाठी जितका संघर्षमय आहे, तितकाच तो रोमहर्षक आणि स्वप्नवत राहिला आहे.

दिल्लीपासून १६५० किलोमीटर दूर असणाऱ्या भूवनेश्वर आणि तेथून ३०० किलोमीटर दूर मयूरभंज व पुढे अजून २५ किलोमीटर दूर द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांचे आदिवासी गाव पहाडपूर आहे. अत्यंत दुर्गम असा भाग गावाकडे जाण्यासाठी चांगला रस्ता देखिल नाही. कुठे चांगले तर अनेक ठिकाणी खड्ड्याचे ते रस्ते पाठीमागे सोडत पहाडपूरला पोहचावे लागते. या गावातील एक वृद्ध व्यक्ती लक्ष्मण बारी यांना विचारले की तुम्ही द्रोपदी मुर्मू यांना ओळखता का तर ती वयस्क व्यक्ती म्हणाली, का नाही ओळखणार मीच तर श्यामचे स्थळ घेऊन तिच्या घरी गेलो होतो. पुढे हसत हसत त्यांनी नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची प्रेमकहानी सांगितली.

लक्ष्मण बारी सांगत होते, द्रौपदी (Draupadi Murmu) आणि श्याम यांचा प्रेमविवाह होता. द्रौपदी यांच्या घरी जाण्यापुर्वी एक आठवडा आधी श्याम याने मला सांगितले मी तिच्यावर प्रेम करतो. ही गोष्ट जवळ जवळ ४२ वर्षांपुर्वीची आहे. मग हेच पहाडपूर गाव द्रौपदी टुडू यांचे सासर बनले. हो त्या लग्नाआधी टुडू होत्या आणि श्याम यांच्या सोबत लग्न झाल्यावर द्रौपदी या मुर्मू बनल्या.

तेव्हा द्रौपदी टुडू या भुवनेश्वर येथील रामा देवी महिला महाविद्यालयातून त्या पदवीचे शिक्षण घेत होत्या. शिक्षणात त्या हुशार होत्या. तेव्हा त्या अर्थात त्यांचे माहेर उपरवाडा येथून भुवनेश्वरला येणाऱ्या एकमेव होत्या. तेव्हाच श्याम मुर्मू सुद्धा भुवनेश्वर मधील एका महाविद्यालायतून पदवीचे शिक्षण घेत होते. या दोघांची ओळख झाली, मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर श्याम यांच्या घरातल्यांनी द्रौपदी यांच्या घरी विवाहाचा प्रस्ताव घेऊन गेले.

द्रौपदी यांच्या वडिलांनी दिला लग्नास नकार (Draupadi Murmu)

द्रौपदी यांच्या वहिनी शाक्यमुनी म्हणतात,‘ मी त्यांच्या लग्नानंतर या घरात आली आहे. पण, मला माझ्या सासूने सांगितले की, द्रौपदी यांचे वडिल बिरंची नारायण टुडू यांना जेव्हा हे प्रकरण समजले तेव्हा ते खूपच नाराज झाले. ते या स्थळाला घेऊन नाराज होते. पण, श्याम यांनी खूपच मनावर घेतले होते. श्याम यांनी आपले काका लक्ष्मण बासी, दुसरे काका आणि गावातील तीन चार नातेवाईकांना घेऊन द्रौपदी यांच्या उपरवाडा या गावा ठाण मांडला. तीन चार दिवस ते द्रौपदी यांच्या वडिलांना या लग्नासाठी मनवू लागले. तिकडे द्रौपदी यांनी देखिल निर्धार केला होता, की लग्न करेन तर श्याम यांच्याशीच. द्रौपदी यांच्या वडिलांनी थोडा वेळ घेतला पण अखेर त्यांनी श्याम यांच्या हट्टापुढे या लग्नाला संमती दिली.

हुंडा ठरला

द्रौपदी या संथाल या समाजातून येतात तर श्याम सुद्धा त्याच समाजातील होते. आता काय द्रौपदी आणि श्याम यांचा तर विवाह पक्का झाला होता. पण, आणखी एक अडचण होती ती म्हणजे हुंड्यांची. हुंड्याबाबत अद्याप काही ठरलं नव्हत. आदिवासी समाजामध्ये नवऱ्या मुलाकडीलच लोक मुलीकडे स्थळ घेऊन जातात आणि त्यांनीच मुलीला हुंडा द्यायचा असतो. मुला आणि मुलीकडच्यांनी मिळून हुंडा किती द्यायचे हे ठरवले. दोघांच्या चर्चेतून मुलीला हुंड्यामध्ये एक गाय, एक बैल आणि १६ जोड कपडे देण्याचे निश्चीत झाले. श्याम मुर्मू यांनी वेळ न दवडता जो काही हुंडा ठरला आहे त्याला हो म्हणाले आणि हा विवाह पक्का झाला आणि काही दिवसांत या दोघांचे लग्न थाटात पार पडले.

Back to top button