विठुमाऊलीच्या गजराने दुमदुमली राजधानी, सांकेतिक वारीला दिल्लीकर मराठी बांधवांचा उस्फूर्त प्रतिसाद | पुढारी

विठुमाऊलीच्या गजराने दुमदुमली राजधानी, सांकेतिक वारीला दिल्लीकर मराठी बांधवांचा उस्फूर्त प्रतिसाद

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
विठुमाऊलीच्या भक्तीत तल्लीन होऊन राजधानीतून निघालेल्या सांकेतिक वारीमुळे विठुरायाच्या गजराने अवघी दिल्ली दुमदुमली.आषाढी एकादशी निमित्त दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या वतीने पहिल्यांदाच अशाप्रकारच्या वारीचे आयोजन करण्यात आले होते.मंगलवेष धारण करीत, वारकरी टोप्या तसेच झेंडे, टाळ हाती घेवून भजन गात, फुगड्या घालत विठुमाऊलीच्या जयघोषात दिल्लीकर मराठी मंडळी न्हाऊन निघाली होती.

रामकृष्ण हरी, ग्यानबा तुकाराम, जय हरी विठ्ठल असा नामघोष करीत रविवारी कनॉट प्लेस परिसरातील हनुमान मंदिरासमोरून पहाटे साडे पाच वाजता ही वारी निघाली. अडीच तासांचे अंतर कापून आर.के.पुरम, सेक्टर-६ येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात ही वारी पोहचली. मंदिराकडून सजवण्यात आलेल्या पालखीने यावेळी सर्वांचे लक्ष वेधले. जवळपास पाचशेहून अधिक मंडळी वारीत उपस्थित असल्याने महाराष्ट्राची संस्कृती,परंपरा तसेच पंढरपुरच्या वारीची प्रतिची इतर भाषिकांना आली. ही वारी राम मनोहर लोहिया सर्कल, नॉर्थ ऍव्हेन्यू, ११ मुर्ती रोडवरील खासदार मनोज तिवारी यांचे निवासस्थान, ब्रिक्स रोज गार्डन (शांतीपथ), कर्नाटक भवन , राव तुलाराम मार्गाने होत विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पोहचली.

आषाढ एकादशीला सांकेतिक वारी अत्यंत आनंद व उत्साहात संपन्न झाली.वारी चा एक मोठा सांस्कृतिक वारसा आहे. ७०० वर्षाहून अधिक काळापासून लाखो वारकरी विठूमाऊलीच्या भेटीच्या ओढीने पंढरपूरला दिंडी सह पोहचतात.दिल्लीतील या पहिल्या प्रयत्नात सर्वजण उत्साहात सहभागी झाले होते. ४०० हून अधिक जणांनी नोंदणी केली होती.वारकरी व त्यांचा जोश बघण्यासारखा होता.अनेक मान्यवर व वरिष्ठ अधिकारीही वारकरी बनून सहजपणे वारीत सहभागी झाले.

दिल्लीकर मराठी बांधव महाराष्ट्रापासून दूर असले तरी नव्या पिढीला वारीची किमया आणि भक्ती परंपरेतून लोकसहभाग याचे दर्शन या निमित्ताने निश्चित झाले.हा प्रयत्न जरी पहिला व छोटा असला तरी महाराष्ट्राबाहेर हा मोठा सांस्कृतिक वारसा जपण्यात या प्रयत्नाने एक खारी चे योगदान निश्चित केले आहे,अशी भावना दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे वैभव डांगे यांनी दैनिक पुढारी सोबत बोलतांना व्यक्त केली.

हेही वाचा : 

 

Back to top button