शहराला अवकाळीचा फटका; अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना; वाहनांचे नुकसान | पुढारी

शहराला अवकाळीचा फटका; अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना; वाहनांचे नुकसान

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि सोसाट्याच्या वार्‍यामुळे 21 वेगवेगळ्या भागांमध्ये झाडपडीच्या घटना घडल्या. गुरुवारी (दि. 9) दुपारी साडेतीन ते संध्याकाळी साडेसातच्या सुमारास अग्निशमन विभागाला 21 कॉल आहे. या घटनांमध्ये अनेक चारचाकी वाहनांचे नुकसान झाले. तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. गुरुवारी दुपारी जिल्ह्यासह शहरात खडकवासला, धायरी, वारजे, शिवाजीनगर, कात्रज आणि कोरेगाव पार्क परिसरात अवकाळी पाऊस पडला. त्याचदरम्यान सोसाट्याचा वारा सुटल्याने अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यांवर, वाहनांवर पडल्या.

याठिकाणी घडल्या घटना

सारंग सोसायटी – सहकारनगर, शेलार मळा – कात्रज, पद्मावती मंदिर – सातारा रोड, हेलिऑन शाळेजवळ – सिंहगड रोड, मॉडेल कॉलनी – शिवाजीनगर, महात्मा सोसायटी – कोथरूड, शारदा निकेतन मुलींचे वसतिगृह – कर्वेनगर, डीपी रोड – कोथरूड (येथील 5 चारचाकी वाहनांवर झाड पडल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले), दांगट पाटील इंडस्ट्रीयल इस्टेट – शिवणे, विद्युतनगर सोसायटी – कोरेगाव पार्क, जैन मंदिरजवळ – भवानी पेठ, हॉटेल वैशाली मागे – फर्ग्युसन रस्ता, सेवासदन शाळेजवळ – एरंडवणा (येथे देखील चारचाकी वाहनावर झाड पडले), साईबाबा मंदिराजवळ – टिंगरे नगर, सुस रोड – पाषाण, नामदेव नगर – वडगाव शेरी, तेजस नगर – कोथरूड (येथे देखील वाहनांवर झाडपडीची घटना), राहुल नगर – कोथरूड, सेनापती बापट रस्ता, डहाणूकर कॉलनी – कोथरूड आणि नाना पेठ पोलिस चौकीसमोर झाडपडीच्या घटना घडल्या.

शहराच्या काही भागात अवकाळी बरसला

पुणे : पुणे शहर, पिपरी चिंचवड आणि जिल्ह्यात मागील दोन ते अडीच महिन्यांपासून उष्णतेची लाट आणि उकाड्याने हैराण केलेल्या पुणेकरांना गुरुवारी थोडासा दिलासा मिळाला. शहर आणि परिसरातील खडकवासला, वारजे, लोहगाव, कोरेगाव पार्क, शिवाजीनगर, लवळे तसेच कात्रज भागात पावसाने संध्याकाळच्या सुमारास हजेरी लावली. दरम्यान 13 मे पर्यंत शहरासह जिल्ह्यात अवकाळी बरसण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान गुरुवारी पुणे शहर आणि परिसरातील कमाल तापमान 40 ते 41 अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले. शहरात दुपारपर्यंत उन्हाचा चटका जाणवत होता.

कुठे, किती पाऊस

(मिलिमीटरमध्ये)

  • खडकवासला– 22.6
  • वारजे– 19
  • कात्रज– 17
  • एनडीए– 18.5
  • लोहगाव– 1.0
  • कोरेगाव पार्क- 0.5
  • शिवाजीनगर- 0.5
  • लवळे– 0.5

हेही वाचा

Back to top button