Sharad Pawar : 'या' दोन नेत्यामुळेच मी पहिल्यांदा आमदार झालो: शरद पवार | पुढारी

Sharad Pawar : 'या' दोन नेत्यामुळेच मी पहिल्यांदा आमदार झालो: शरद पवार

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा काँग्रेसमधील सर्वच नेत्यांचा विरोध असताना दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि यशवंतराव चव्हाण यांच्यामुळेच मला वयाच्या २५- २६ व्या वर्षी उमेदवारी मिळाली. मी आमदार म्हणून पहिल्यांदा विधानसभेत गेलो, त्यानंतर मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदाची जबाबदारीही दिली, अशी आठवण राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार  (Sharad Pawar) यांनी सोमवारी (दि.११) सांगितली. वसंतराव नाईक महाविद्यालयातर्फे आयोजित राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

व्यासपीठावर माजी मंत्री राजेश टोपे, आमदार सतीश चव्हाण, राजेश राठोड, विक्रम काळे, एमजीएमचे कुलपती अंकुशराव कदम, निलेश राऊत, माजी आमदार किशोर पाटील, कैलास पाटील चिकटगावकर, द्वारकाभाऊ पाथ्रीकर, रंगनाथ काळे आदींची उपस्थिती होती.

आमच्या जिल्ह्यातील सगळ्या काँग्रेस नेत्यांचा हाेता विरोध

पवार (Sharad Pawar) म्हणाले, काही लोकांचे स्मरण माझ्या अंतकरणात कायम आहे, त्यात यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक आहेत. तरुण कार्यकर्ता म्हणून मी काम करत असताना विधानसभा निवडणुकीसाठी तिकिट मागितले असता, आमच्या जिल्ह्यातील सगळ्या काँग्रेस नेत्यांनी विरोध केला. माझे वय तेव्हा २५-२६ वर्ष होते. जिल्ह्यातील नेते वसंतराव नाईक व यशवंतराव चव्हाण यांच्याकडे गेले होते. त्यावेळी या दोघांनीही त्यांना विचारले की, २८८ जागा असून त्यातील आपल्या किती जागा निवडून येतील. यावर त्यांनी १९० ते २०० जागा येतील, असे उत्तर दिले. याचा अर्थ ९८ जागा आपल्या पडतील, त्यात आणखी एक पडली तरी काही हरकत नाही, शरद पवारला तिकिट देऊन टाका, असा निर्णय दोन्ही नेत्यांनी दिला.

मी पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेलो, त्याच्यामागे यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांची मोठी शक्ती होती. त्यानंतर पाच वर्षांनी मुख्यमंत्री नाईक यांच्या मंत्रिमंडळात मला संधी देण्यात आली. मुख्यमंत्री नाईक यांच्याकडे सामान्य प्रशासन आणि गृह खाते होते. या खात्याचा राज्यमंत्री म्हणून त्यांनी माझी निवड केली. नव्या पिढीतील लोकांना प्रोत्साहन, अधिकार आणि जबाबदारी देण्याचा नाईकसाहेबांचा स्वभाव होता. राज्यमंत्री असतानाही त्या खात्याचे ९० टक्के काम त्यांनी माझ्यावर सोपविले होते. त्यात काही चुकले, तर दुरुस्त करण्याची जबाबदारी घ्यायचे, अशी आठवणही पवार यांनी सांगितली.

यावेळी आमदार राठोड यांनी देशातील विविध राज्यात बंजारा समाजाच्या आरक्षणाकडे लक्ष वेधत ‘वन नेशन वन कॅटेगरी’त बंजारा समाज यावा, तसेच मूळ एस.टी. आरक्षणाला हात न लावता समाजाला एस.टी. ‘ब’ म्हणून दर्जा द्यावा, अशी मागणी केली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button