दाभोलकर हत्याप्रकरण | कोर्टाच्या निर्णयावर दाभोलकर कुटुंबियांची पहिली प्रतिक्रिया | पुढारी

दाभोलकर हत्याप्रकरण | कोर्टाच्या निर्णयावर दाभोलकर कुटुंबियांची पहिली प्रतिक्रिया

पुढारी ऑनलाईन डेस्क: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणात न्यायालयाने तब्बल ११ वर्षानंतर आज (दि.१०) निकाल जाहीर केला. या प्रकरणात दोन संशयित आरोपींवर आरोप सिद्ध झाल्याने त्यांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, तर तिघांवरील आरोप सिद्ध न झाल्याने त्यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. यावर नरेंद्र दाभोलकर यांचे सुपुत्र हमीद दाभोलकर यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर त्यांची मुलगी मुक्ता दाभोलकर यांनी देखील न्यायालय निर्णयाचे स्वागत करत, ज्यांची या खटल्यात निर्दोष सुटका करण्यात आली आहे, त्यांच्या विरोधात आम्ही पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. (Narendra Dabholkar Case Verdict)

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण खटल्याचा तब्बल ११ वर्षांनी शुक्रवारी (दि.१०) निकाल लागला. दाभोलकर हत्या प्रकरणी वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यां तिघांची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. तर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने या दोघांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच प्रत्येकी ५ लाखांचा दंड देखील आकारण्यात आल्याचे वकीलांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे. (Narendra Dabholkar Case Verdict)

पुढे मुक्ता दाभोलकर यांनी म्हटले आहे की, या हत्येमधील मास्टरमाईंट अद्यापही मोकाटच आहेत. त्यामुळे सीबीआयने त्यांचा शोध घेऊन, त्यांना योग्य ती शिक्षा सुनावली पाहिजे. याप्रमाणेच गोविंद पानसरे आणि गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणातील तपासात गुन्हेगारांचा लवकरात लवकर शोध घेतला पाहिजे, असे देखील मुक्ता दाभोलकर यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना महटले आहे. (Narendra Dabholkar Case Verdict)

हत्येचा तपास पूर्ण होऊन सप्टेंबर २०२१ मध्ये पुण्यातील विशेष न्यायालयाने पाच आरोपींविरोधात आरोप निश्चित केले आणि खटल्यास सुरुवात झाली. जवळपास अडीच वर्षांपासून हा खटला सुरू आहे. या खटल्याची सुनावणी नुकतीच पूर्ण झाली आहे. शुक्रवारी (दि. १०) या खटल्याचा निकाल लागला. (Narendra Dabholkar Case Verdict)

हेही वाचा:

 

Back to top button