आसाम-मेघालयात पूरसंकट गंभीर | पुढारी

आसाम-मेघालयात पूरसंकट गंभीर

गुवाहाटी वृत्तसंस्था : आसाममध्ये पुराने हाहाकार माजवला असून गेल्या 24 तासांत पुराच्या पाण्यात बुडून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात पूरस्थिती आणि भूस्खलनाच्या घटनांमधील एकूण मृतांचा आकडा 62 वर गेला आहे. तर 8 नागरिक बेपत्ता आहेत. 32 जिल्ह्यांतील 31 लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. चार हजारांहून अधिक गावे पुरात बुडाली आहेत.

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार 62 पैकी 51 मृत्यू पुरामुळे तर 11 मृत्यू भूस्खलनामुळे झाले आहेत. राज्यातील एकट्या बारपेटा जिल्ह्यातील सर्वाधिक 7.31 लाख तर दरांग जिल्ह्यात 3.54 लाख, बजली 3.52 लाख, नागाव 2.41 लाख, गोलपाडा 2.21 लाख, कामरूप 2.18 लाख, नलबारी 1.65 लाख, लखीमपुर 1.14 लाख, होजै 1.25 लाख आणि बोंगईगाव येथे 1.13 लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. आसामसह मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि भूतान राज्यातही सर्व नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. अनेक ठिकाणी नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत. पूरग्रस्त भागात पुरेशा प्रमाणात अन्‍नाची खात्री करा, बचाव कार्यात कोणतीही तडजोड करू नका, असे निर्देश मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा यांनी दिले आहेत.

514 मदत शिबिरे
पूरग्रस्त जिल्ह्यात प्रशासनाने 514 शिबिरे सुरू केली असून 302 वितरण केंद्रे स्थापन केली आहेत. या शिबिरांमध्ये सध्या 1 लाख 56 हजार 365 नागरिकांनी आसरा घेतला आहे. इतरही अनेक नागरिकांनी रस्ते आणि उंच ठिकाणी आसरा घेतला आहे.

मृतांची संख्या 81 वर : दोन्ही राज्यांत मिळून 40 लाख नागरिक प्रभावित

  • एकट्या आसाममधील 31 लाख नागरिकांना फटका
  • दिब्रुगड येथे बोट उलटून 5 बेपत्ता
  • मेघालयात आतापर्यंत 19 मृत्यू

चार हजारांवर गावे पाण्यात

118 महसूल सर्कलमधील 4,291 गावे पाण्यात बुडाली असून 66,455.82 हेक्टर जमिनीवरील पिके पाण्यात गेली आहेत. 25.54 लाखांहून अधिक जनावरांना पुराचा फटका बसला आहे. गेल्या 24 तासात भारतीय सैन्य दल, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ, अग्‍निशमन, आपत्कालीन सेवा आणि जिल्हा प्रशासनाच्या बचाव पथकांनी 22 जिल्ह्यांत लहान मुले आणि महिला असा 9102 जणांचा वाचवले आहे.

हेही वाचा

Back to top button